आगीपासून पीव्हीसी पाईप्स वाचविण्याच्या प्रयत्नात वृध्द शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 06:20 PM2019-01-30T18:20:11+5:302019-01-30T18:20:56+5:30
अशक्तपणामुळे त्यांना लवकर उठता न आल्याने त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.
उस्मानाबाद : तालुक्यातील बेंबळी येथील वृध्द शेतकऱ्याचा पेटविलेल्या उसाच्या पाचटातील पाईप काढताना पाय अडकून पडल्याने आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. आप्पाराव साधू डावकरे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
आप्पाराव साधू डावकरे यांच्या शेताचे शेजारील शेतकरी कालिदास नागनाथ डावकरे यांनी ओढ्यातील काटेरी झुडपे, वाळलेल्या गवताची अडचण दूर करण्यासाठी ओढा पेटविला होता. वाऱ्यामुळे पसरलेल्या आगीने त्यांच्याच उसाच्या फडातील पाचटाने पेट घेतला होता. या पाचटात ठेवलेल्या पीव्हीसी पाईपचे जळून नुकसान होऊ नये यासाठी आप्पाराव डावकरे यांनी पेटलेले पाचट विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले होते. जीव वाचविण्यासाठी त्यांनी तेथून निघण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा पाय अडकून ते खाली पडले. अशक्तपणामुळे त्यांना लवकर उठता न आल्याने त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.
याबाबत कालीदास डावकरे व परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझवून आगीने गंभीररित्या भाजलेले आप्पाराव डावकरे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र, तोवर उशीर झाला. या घटनेची माहिती त्यांनी तलाठी व पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. या घटनेची बेंबळी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शेतकरी आप्पाराव डावकरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.