उमरग्यात मृतांची संख्या शंभरीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:35 AM2021-04-23T04:35:34+5:302021-04-23T04:35:34+5:30

उमरगा : तालुक्यात आत्तापर्यंत ३ हजार ३०६ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, ॲक्टिव्ह बाधितांची संख्या मुळज, गुंजोटी, बलसूर, माडज ...

The death toll in Omar is over a hundred | उमरग्यात मृतांची संख्या शंभरीपार

उमरग्यात मृतांची संख्या शंभरीपार

googlenewsNext

उमरगा :

तालुक्यात आत्तापर्यंत ३ हजार ३०६ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, ॲक्टिव्ह बाधितांची संख्या मुळज, गुंजोटी, बलसूर, माडज व दाळिंब या गावात अधिक आहे. तालुक्यातील २ हजार ६३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असली तरी मृतांच्या आकड्याने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे चिंता कायम आहे. कोरोना संसर्ग वाढलेल्या गावात अनेक उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी अद्याप काही त्रुटी आहेत.

तालुक्यातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या मुळज येथे आहे. सध्या येथे ३२ ॲक्टिव्ह कोरोनाबाधित असून, याची दखल घेत उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंखे यांनी मुळज गावाला भेट देऊन आढावाही घेतला आहे. सध्या मुळज येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण चालू आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी मल्टी व्हिटॅमिन गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. असे असले तरी येथे होमक्वारंटाईन असलेले रुग्ण गावात फिरताना दिसत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका वडणे म्हणाल्या. तालुक्यातील माडज येथे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १४ झाली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, वाढत्या संसर्गाची दखल घेत ग्रामपंचायतीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. सरपंच विजयकुमार बाचणे, उपसरपंच नरेंद्र माने, ग्राम विकास अधिकारी गणेश मानतुटे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, गावात अनेक दिवसांपासून सॅनिटाझर फवारणी झालेली नाही. शिवाय, नागरिक नियमांचे पालनही करीत नाहीत.

तालुक्यातील गुंजोटी येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या येथे २२ ॲक्टिव्ह रुग्ण असून, नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वत्र संचारबंदी असताना येथे मात्र नागरिक मुक्तपणे फिरत आहेत. तरुण मुले एकत्र येत मोबाईलवरील लुडोसारखे खेळ खेळत आहेत. चावडी, वेशीवर संचारबंदीचे नियम टांगले जात आहेत. मुंबई, पुणे, हैदराबाद, औरंगाबादसारख्या शहरांतून गावाकडे परतलेले गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. गुंजोटी गाव मोठे असून येथील लोकसंख्याही जास्त आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावात फक्त दोनच पोलीस असल्याने त्यांच्यावरही ताण पडत आहे. गुंजोटी गावात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक यांची एक कोरोना दक्षता समिती असून, या समितीमार्फत गावात सर्वत्र फिरून घराबाहेर न पडण्याबाबत सूचना देणे गरजेचे आहे.

बलसुर येथेही १४ कोरोनाबाधितांची संख्या आहे. जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण याच गावात मिळून आला होता. तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर येथे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, गावातील लोक संचारबंदी नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.

तालुक्यातील दाळिंब येथेही ११ कोरोनाबाधितांची संख्या असून, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे यांनी गावाला भेट देऊन आढावा घेऊन संबंधितांना सूचना दिल्या आहेत. हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने लोकांची नेहमीच गर्दी असते. येथे शारीरिक अंतर व मास्कचा वापर नियमित वापराबाबत सक्ती करणे गरजेचे आहे.

उमरगा तालुक्यातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या मुळज येथे असल्याने उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साळुंखे यांनी मुळज गावाला भेट दिली. यावेळी मुळज प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका वडने, सरपंच सुनीता वडदरे, उपसरपंच प्रवीण शिंदे पाटील व प्रा. आ. केंद्र कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The death toll in Omar is over a hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.