शेती विकूनही कर्ज फिटेना; तणावात पती-पत्नीने एकाच साडीने गळफास घेऊन संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:26 PM2022-08-24T12:26:48+5:302022-08-24T12:28:41+5:30

शेती साथ देत नसल्याने प्रकाश यांनी आपल्या चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली होती.

Debt not fit even after selling land; In tension, farmer husband and wife ended their lives by hanging themselves with the same saree | शेती विकूनही कर्ज फिटेना; तणावात पती-पत्नीने एकाच साडीने गळफास घेऊन संपवले जीवन

शेती विकूनही कर्ज फिटेना; तणावात पती-पत्नीने एकाच साडीने गळफास घेऊन संपवले जीवन

googlenewsNext

कळंब (जि. उस्मानाबाद) : सुखात चालणाऱ्या संसाराला दृष्ट लागावी अन् होत्याचं नव्हतं व्हावं, अशीच एक गंभीर घटना नायगाव येथे सोमवारी घडली असून, ३० वर्षांच्या तरुणाने पत्नीसह एकाचवेळी आत्महत्या करत आपला जीवन प्रवास संपवला आहे. दोघांनीही राहत्या घरी एकाच साडीने गळफास घेतला.

कळंब तालुक्यातील नायगाव येथील प्रकाश वसंत दीक्षित (पोतदार) हा ३० वर्षीय तरुण आपल्या आई व पत्नी अश्विनी (२६) यांच्यासमवेत गावात वास्तव्य करत होता. पितृछत्र हरपलेल्या प्रकाश यांना जेमतेम चार एकर जमीन. सातत्याने नैसर्गिक संकटात सापडलेली शेती, घरची बिकट आर्थिक परिस्थिती यामुळे या तोकड्या जमिनीत उदरनिर्वाह भागवणे त्यांना कठीण जात होते. यातूनच निर्माण झालेल्या आर्थिक संकटाने कुटुंबातही ताणतणाव होता, असे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, सोनार गल्ली भागातील आपल्या घरात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे प्रकाश अन् पत्नी एका खोलीत तर आजी रतन यांच्याजवळ प्रकाश यांचा एक लहान मुलगा व मुलगी झोपली होती. 

सोमवारी सकाळी पती-पत्नी लवकर बाहेर न आल्याने आत डोकावले असता प्रकाश व त्याची पत्नी अश्विनी यांनी एकाच साडीने घराच्या लोखंडी आडूला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शिराढोण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून सोमवारी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद केली. शिराढोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर रात्रीच्या सुमारास पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देणी देण्यासाठी दीड एकर विकली...
शेती साथ देत नसल्याने प्रकाश यांनी आपल्या चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली होती. याउपरही देणं बाकीच होतं. यामुळे दाम्पत्यात ताणतणाव होता. यातून त्यांच्यात खटकेही उडत असत, असे सांगण्यात येत आहे. त्यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे त्यांची दोन चिमुकली पोरकी झाली.

Web Title: Debt not fit even after selling land; In tension, farmer husband and wife ended their lives by hanging themselves with the same saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.