अधिसूचना अंमलबजावणीसाठी घेतला आंदोलनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:25+5:302021-05-28T04:24:25+5:30
वाशी : गेल्या ४० वर्षापासून डी. एड. पदवीधर माध्यमिक शिक्षकांना मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीचा निषेध नोंदवित ८ जून २०२० ...
वाशी : गेल्या ४० वर्षापासून डी. एड. पदवीधर माध्यमिक शिक्षकांना मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीचा निषेध नोंदवित ८ जून २०२० च्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास आंदोलन छेडण्याचा निर्णय महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणी ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला.
संस्थापक अध्यक्षा पद्मा तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
यावेळी संजय देशमुख व दिनेश कुटे यांनी मार्गदर्शन केले. महासचिव बाळा आगलावे व लातूर विभागाचे सचिव लक्ष्मण राठोड यांनी डी. एड. पदवीधर शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. तसेच कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी शासनाने ८ जून २०२० रोजी अधिसूचना काढून शिक्षकांच्या आशा पल्लवित केल्या. परंतु, अजूनही या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नसल्याने महासंघाला आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. उपाध्यक्ष विश्वनाथ मघाडे, बंडुभाऊ धोटे, राजेंद्र मसराम यांनी या मताला दुजोरा देऊन हा मार्ग आपल्यासाठी अंतिम असल्याचे मत मांडले. कोषाध्यक्ष शहरात हुसेन, विभागीय सचिव काळूराम धनगर, जांभुळे, बापूसाहेब सावंत, बी. डी. कांबळे आदी सदस्यांनी देखील आंदोलनाला सहमती दर्शवली. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळत ८ जून रोजी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला असल्याचे लातूर विभागाचे सचिव लक्ष्मण राठोड यांनी सांगितले.