शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण प्रकरणात सदस्य अपात्रतेचा निर्णय आयुक्तांकडूनही कायम
By गणेश कुलकर्णी | Published: March 17, 2023 04:13 PM2023-03-17T16:13:47+5:302023-03-17T16:14:06+5:30
सुरतगाव ग्रामपंचायतीतील प्रकरण
तामलवाडी (जि. धाराशिव) : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ग्रामपंचायतीतील दोन सदस्यांच्या अपात्रतेचा धाराशिव जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनीदेखील कायम ठेवला आहे.
शासकीय मालमत्तेचे हस्तांतरण व अतिक्रमणप्रकरणी सुरतगाव येथील दादासाहेब विठ्ठल घोडके व लक्ष्मी विठ्ठल घोडके या दोन ग्रामपंचायत सदस्यांना विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी अपात्र घोषित केले. पारधी समाजास शासकीय योजनेतून ग्रामपंचायत स्तरावरून दिलेले घरकुल शासनाची कोणतीही परवानगी न घेता त्यांनी जागेसह खरेदी केले होते. तसेच हे घरकुल विकत घेत असताना शासकीय योजना कागदावर येऊ दिली नाही. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही सदस्यांना अपात्र घोषित केले होते. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयात दाखल करण्यात आली होती. सदर आव्हान याचिकेवर आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी निकाल देऊन जिल्हाधिकारी यांचा निर्णय योग्य व कायम ठेवत दोन्ही सदस्यांना अपात्र घोषित केले आहे.