ग्रामीण डाकसेवकांना नियमित कर्मचारी घोषित करा; धाराशीवमध्ये चारशे कर्मचारी संपावर
By सूरज पाचपिंडे | Published: October 4, 2023 07:32 PM2023-10-04T19:32:13+5:302023-10-04T19:33:08+5:30
पोस्टाची सेवा कोलमडली; ग्रामीण डाकसेवकांना अद्यापही अर्धवेळ कर्मचारी म्हणून सेवा करावी लागत आहे.
धाराशिव : ग्रामीण डाकसेवकांना नियमित कर्मचारी घोषित करण्यात यावे, तसचे विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी-सुविधा लागू करण्यात याव्यात, या मागणीसाठी ऑल इंडीया डाक सेवक युनियनच्या वतीने ४ ऑक्टोबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. धाराशिव जिल्ह्यातील सुमारे चारशे ग्रामीण डाकसेवकांनी बुधवारी कामबंद ठेवून आंदोलन करण्यात आले.
डाक विभागाचा ग्रामीण भागातील कणा म्हणून ग्रामीण डाकसेवकांना ओळखले जाते. मात्र, ग्रामीण डाकसेवकांना अद्यापही अर्धवेळ कर्मचारी म्हणून सेवा करावी लागत आहे. शिवाय, शासनाच्या सोयी-सुविधांही लागू नाहीत. त्यामुळे ऑल इंडीया ग्रामीण डाकसेवक युनियनने ४ ऑक्टोबर रोजी एकदिवशीय देशव्यापी संप पुकारला आहे. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण डाकसेवकांनी काम बंद ठेवून तालुकाच्या ठिकाणी पोस्ट कार्यालयासमोर आंदोलन सुरु केली आहेत. धाराशिव पोस्ट कार्यालयातील ग्रामीण डाकसेवकांनी काम बंद ठेवून कार्यालयासमोर ठिय्या दिला होता.
जी.डी.एस. समितीच्या शिफारसीप्रमाणे १२,२४,३६ सर्व वरीष्ठ जी.डी.एस. यांना अतिरिक्त वेतनवाढ देण्यात यावी, जीडीएस कर्मचाऱ्यांन नियमित कर्मचारी घोषित करावी, विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारी रजा, घरभाडे भत्ता, टीए/डीए, पेंन्शन, मेडीकल सुविधा, शिक्षण भत्ता सुविधा लागू करण्यात यावी, मोफत आयपीपीबी प्रशिक्षण देण्यात यावे, अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरल्या होत्या, आंदोलनात कॉ. महेमुदखाँ पठाण, आर.जी. उंबरे, शिवशरण झिंगाडे, डि.पी. भास्कर, किसन जावळे, निहाल तांबोळी, स्नेहलक्ष्मी कटके, मु.एस. झाडे आदींसहभागी झाले होते. दरम्यान, ग्रामीण डाकसेवकाच्या संपामुळे सुकन्या डिपोझिट, पोस्टल विमा, टपाल वितरण, पासपोर्ट वितरण, आरडी डिपोझिट, ग्रामीण टपाल विमा, एटीएम, चेकबुक वाटप, इंडीया पोस्ट पेमेंट बँकेचे कामकाज ठप्प होती.