वाढत्या तापमानामुळे दूध उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:32 AM2021-03-16T04:32:01+5:302021-03-16T04:32:01+5:30
पाथरुड : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचे चटके बसू लागले असून, भूम तालुक्यात ...
पाथरुड : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचे चटके बसू लागले असून, भूम तालुक्यात वाढत्या तापमानामुळे दुग्ध उत्पादनात घट येत असल्याचे पशुपालक सांगत आहेत.
भूम तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतकरी कुटुंबाकडे दुभती जनावरे आहेत. उन्हाळ्यातील उदरनिर्वाहाचे साधन म्हणून दुभत्या जनावरांकडे शेतकरी पाहतो. सध्या मार्चमध्येच उन्हाचे चटके तीव्र जाणवू लागल्याने दुभत्या जनावरांची भूक मंदावत आहे. त्यामुळे आपोआपच दुधातही घट येत आहे, शिवाय दुधातील स्निग्धतेचेही प्रमाण कमी होऊन दुधाची प्रतही खालावत आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे शेतकरी जनावरांना झाडाखाली, तसेच पत्र्याच्या गोठ्यावर पाचट टाकून उन्हांपासून पशुधनाचे संरक्षण करीत असल्याचे दिसत आहे.
अशी घ्यावी काळजी
उन्हाची तीव्रता वाढल्याने जनावरांची तहान वाढली असून, जनावरांना दिवसांतून किमान तीन वेळेस पाणी पाजावे. ऊन व उष्णतेपासून बचावासाठी चांगली सावली करावी. उन्हाळ्यातील मार्च, एप्रिल व मे महिन्यात पशुपालकांनी पशुंची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक मारकड यांनी केले आहे.