मिम्स व्हायरलकरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची बदनामी; चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 01:00 PM2022-12-27T13:00:23+5:302022-12-27T13:00:40+5:30
आरोपींवर अश्लील मजकूर प्रसारित केल्याचे कलम लावण्यात आले आहे
उस्मानाबाद : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे फोटो वापरून सोशल मीडियात बदनामी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष बालाजी गुंजाळ यांनी ही तक्रार केली.
शिवसेना शिंदे गटाचे भूम तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ हे २४ डिसेंबर रोजी समाधान सातव, नीलेश चव्हाण, विशाल ढगे यांच्यासमवेत भूम पंचायत समिती परिसरात थांबले होते. यावेळी ते त्यांच्या मोबाइलवर सोशल मीडिया पाहत असताना, मिम्स कट्टा ग्रुपवर अर्जुन शिंदे, मिम नाका ग्रुपवर जितेंद्र रायकर, एक करोड हसणाऱ्या लोकांचा ग्रुपवर आर. एन. पाटील यांनी व रोशनी शिंदे-पवार यांनी त्यांच्या वैयक्तिक अकाउंटवरून आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याबद्दल अवमानकारक आणि बदनामी करण्याच्या हेतूने त्यांच्या फोटोवर विविध मजकूर लिहून प्रसिद्ध केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी बालाजी गुंजाळ यांनी भूम पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून उपरोक्त चौघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान व भारतीय दंड विधानच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
अश्लील मजकूर प्रसारित केल्याचे कलम...
पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कलम ६७ आरोपींवर लावला आहे. जी कोणी व्यक्ती कामुकभावना वाढवील किंवा भावना चाळवील किंवा त्यात अंतर्भूत असलेला किंवा त्यात समाविष्ट असलेला मजकूर वाचण्याचा, पाहण्याचा किंवा ऐकण्याचा संभव असलेल्या व्यक्तींना नीतिभ्रष्ट करण्याचा त्यात प्रभाव असेल तर, हे कलम लावले जाते. याच्या पहिल्या अपराधासाठी तीन तर दुसऱ्या अपराधासाठी पाच वर्षांपर्यंत कारावास व अनुक्रमे पाच आणि दहा लाख रुपयांची शिक्षा होऊ शकते. तसेच कलम ५०५ (२)साठी धर्म, जात, जन्माचे ठिकाण यावरून तेढ निर्माण करणारे साहित्य प्रसारित करणे आवश्यक आहे.