७ हजार कोटींची केंद्राकडे मागणी - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 06:36 AM2018-11-07T06:36:34+5:302018-11-07T06:36:50+5:30
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत़ याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे.
उस्मानाबाद - राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत़ याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे़ तो आजच केंद्राकडे पाठवीत असून, जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होवू शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली.
जिल्'ाच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री मंगळवारी उस्मानाबादेत आले होते़ यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकार सज्ज असल्याचे सांगितले़ ते म्हणाले, आतापर्यंत कधीही दुष्काळी उपाययोजनांसाठी इतक्या जलद पावले उचलली गेली नाहीत़ आम्ही आॅक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर केला़ आता मदतीचा प्रस्ताव पाठवीत आहोत़ डिसेंबरपर्यंत केंद्राचे पथक पाहणी करेल व जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल.पाणीटंचाई निवारणासाठीही आराखडे तयार झाले आहेत़ यासाठी निधी कमी पडू देणार नाही़ कोणत्याही भागात
अन्न-धान्याची टंचाई भासल्यास
तेथे पुरवठ्यासाठी सरकारची तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले़
कृष्णा-मराठवाडा योजनेसाठी
लवकरच २२०० कोटी
कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी आखलेल्या योजनेला आमच्या सरकारने गती दिली आहे़ आतापर्यंत ८०० कोटी रुपये निधी या योजनेस दिला़ तो पूर्णत्वाकडे नेण्यासाठी २२०० कोटी रुपयांचे कर्ज नाबार्डकडून घेण्यात येत आहे़ ते मिळताच योजनेसाठी एकरकमी निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली़
मुनगंटीवारांनी कुठे बंदूक चालविली?
अवनी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखणच केली़ ते म्हणाले, परिस्थितीनुसार काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात़ मुनगंटीवार यांचा राजीनामा घ्यायला त्यांनी स्वत: तर बंदूक हातात घेऊन अवनीला ठार केले नाही ना? मात्र, ठार करण्याची जी प्रक्रिया आहे, त्यात काही चूक झाली असल्यास चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.