घरे पाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:34 AM2021-07-27T04:34:11+5:302021-07-27T04:34:11+5:30
भूम : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील मागासवर्गीयांची घरे जेसीबीने उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच त्याच जागेवर घरकूल योजनेतून घरकूल ...
भूम : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील मागासवर्गीयांची घरे जेसीबीने उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच त्याच जागेवर घरकूल योजनेतून घरकूल बांधून पुनर्वसन करावे, अशी मागणी रिपाइंच्या वतीने मराठवाडा उपाध्यक्ष भागवतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खामसवाडी येथील जवळपास १९ कुटुंबांना कसल्याही प्रकारची नोटीस न देता जेसीबीच्या साह्याने त्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. यात त्यांच्या संसारोपयोगी भांडी व इतर धान्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे याचा तातडीने पंचनामा करावा, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना किंवा इतर योजनेतून त्या ठिकाणी घरे बांधून देऊन सर्व कुटुंबाचे पुनर्वसन करावे, मागासवर्गीय बेरोजगारांना तत्काळ रोजगार उपलब्ध करून द्यावा, सरपंच आणि इतरांवर गुन्हे दाखल करावेत, राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणात दोन दिवसात कारवाई नाही झाल्यास उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, उपाध्यक्ष उत्तम सोनवणे, शुभम सोनवणे, रोहित सोनवणे, जयभीम सोनवणे, कुणाल साठे, अभिजीत गवळी, राहुल आवारे, सुधीर गायकवाड, अनिकेत सावंत, माणिक थोरात, पंचशील गायकवाड, विश्वजीत सोनवणे, धम्मदीप सोनवणे, सुजित शिंदे, गोकुळ गवळी, अनिल भालेराव आदींच्या सह्या आहेत.