मुबलक पाणी असतानाही टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:01 AM2021-03-04T05:01:43+5:302021-03-04T05:01:43+5:30

उमरगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही शहरात पालिकेकडून मात्र नळाद्वारे दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात ...

Despite the abundance of water | मुबलक पाणी असतानाही टंचाईच्या झळा

मुबलक पाणी असतानाही टंचाईच्या झळा

googlenewsNext

उमरगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही शहरात पालिकेकडून मात्र नळाद्वारे दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासियांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच शहरातील शास्त्रीनगर भागातील बोअरही पालिकेने टाकी काढून बंद केल्यामुळे मागील महिनाभरापासून रहिवाशांचे हाल चालू असल्याचे सांगत या भागातील महिलांनी आज थेट नगर परिषद गाठून अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला.

शहराला माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प व कोरेगाव तलावातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा केला जातो. सध्या या दोन्ही तलावात भरपूर पाणीसाठा असतानाही सततची पाईपलाईन गळती व खंडित वीज पुरवठ्यामुळे शहराला दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीगळती मुळे पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी दरवर्षी पालिका ७० लाख रुपये खर्च करते. तरीही पाणी गळतीची समस्या कायम आहे. शहरातील बोअरलाही सध्या मुबलक पाणी आहे. परंतु, यातील बहुतांश बोअर देखील सातत्याने बंद पडत असून, याची वेळेवर दुरूस्ती होत नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. शहरातील सार्वजनिक बोअर याची दुरुस्ती, देखभाल यासाठी एका कंत्राटदारांसोबत करार करण्यात आला असून, वर्षभरात शहरातील पालिकेच्या अधिकाराखालील सर्व बोअरची दुरुस्ती व देखभाल करण्याच्या बदल्यात वर्षाला नऊ लाख रुपये अदा केले जातात. परंतु, हा कंत्राटदार नादुरुस्त बोअर महिना महिना दुरुस्त करीत नसल्याच्या शहरवासियांच्या तक्रारी आहेत. शहरातील शास्त्रीनगर भागातही मागील महिनाभरापासून रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे या भागातील त्रस्त महिलांनी बुधवारी थेट नगर परिषद गाठून आपली कैफीयत मांडली. तेथील चालू असलेल्या सार्वजनिक बोअरवरील पाण्याची टाकी महिनाभरापूर्वी दोन दिवसात परत बसवितो म्हणून काढून नेली असून, अद्याप ती बसविली नसल्याची तक्रार त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे सभापती बालाजी पाटील यांच्याकडे केली. यावर सभापती बालाजी पाटील यांनीही पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी पाणीपुरवत्यावर वर्षभरात कशा कशावर किती खर्च होतो याची माहिती बैठकीत देण्यास सांगितले.

कोट....

शहरातील कोणतेही सार्वजनिक बोअर सलग आठ दिवस चालत नाहीत. दुरुस्तीच्या नावाखाली कंत्राटदार कोणतेही काम करीत नसताना त्याला वर्षाला नऊ लाख कशासाठी अदा केले जातात, असा प्रश्न आहे. त्यामुळे बोअर सतत बंद पडणे व कंत्राटदाराच्या कामाबाबत चौकशी करावी.

- अशोक बनसोडे,सामाजिक कार्यकर्ता

मी पाणीपुरवठा विभागाच्या सभापतीपदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे. शहरातील पाणी पुरवठ्याच्या बाबतीत अनेक तक्रारी ऐकण्यात येत आहेत. नेमका काय घोळ आहे, याच्या मुळाशी मी जाणार असून, शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई केली जाईल.

-बालाजी पाटील, पाणीपुरवठा सभापती

फोटो- सार्वजनिक बोअर व पाण्याची टाकी बसविण्याच्या मागणीसाठी शहरातील शास्त्री नगर परिसरातील महिलांनी बुधवारी पालिकेत जाऊन सभापतींची भेट घेतली.

Web Title: Despite the abundance of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.