वन्यप्राण्यांकडून भुईमुगाच्या पिकाची नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:32 AM2021-05-14T04:32:09+5:302021-05-14T04:32:09+5:30
तामलवाडी - तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीसह परिसरातील साठवण तलावात यंदा बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग पिकावर भर दिला. ...
तामलवाडी - तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीसह परिसरातील साठवण तलावात यंदा बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग पिकावर भर दिला. हे पीकही जाेमदार आले आहे; परंतु सध्या हे पीक वन्यप्राणी फस्त करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, काही शेकऱ्यांनी शेतात लाकडी आटाेळे उभे करून पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे यंदा तामलवाडीसह परिसरातील लहान-माेठ्या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन संबंधित शेतकऱ्यांनी गळीत पीक म्हणून उन्हाळी भुईमूग पिकावर भर दिला. पाण्याच्या उपलब्धतेमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जाेमदार आली आहेत. दरम्यान, या पिकास शेंगा लागल्या असतानाच आता वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. रानडुक्कर, काेल्हा, सायाळ आदी प्राणी भुईमूग पीक फस्त करू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या तावडीतून पीक वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी शक्कल लढविली आहे. भुईमूग पिकामध्ये लाकडी आटाेळे तयार करण्यात आले आहेत. या आटाेळ्यांवर शेतकरी रात्री मुक्कामी राहून पीक वाचविण्यासाठी धडपडत आहेत.
चौकट
नुकसानभरपाई नाही.
दोन महिन्यांपूर्वी शेतकरी गाेवर्धन गुंड यांनी सुरतगाव शिवारात द्राक्षांची लागवड केली. मात्र, या पिकातही रानडुकरांनी धुमाकूळ घातला. यात संबंधित शेतकरी गुंड यांचे माेठे नुकसान झाले. त्यांनी ऑनलाईन तक्रार केली. महसूल विभागाकडून पंचनामाही करण्यात आला; परंतु आजवर नुकसानभरपाईपाेटी छदामही मिळाला नाही. याबाबत संबंधित शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.