Tanaji Sawant: "त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली", तानाजी सावंतांचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 10:14 AM2022-09-26T10:14:40+5:302022-09-26T10:40:09+5:30
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे
उस्मानाबाद - शिवसेनेच्या शिंदे गटातील प्रमुख शिलेदार आणि राज्याचे सार्वजनिकमंत्री तानाजी सावंतमराठा आरक्षणासंदर्भात भाषण करताना तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. राज्यात २०१४ ते २०१९ या कालावधीत मराठा आरक्षणासाठीदेवेंद्र फडणवीसांवर प्रचंड आरोप केले, मराठा क्रांती मोर्चे काढले, आंदोलने केली. ज्यांना ब्राह्मण म्हूणून हिणवलं गेलं. पण, त्याच ब्राह्मणाने मराठ्यांची झोळी २०१७-१८ मध्ये भरली, असे सावंत यांनी म्हटले आहे. उस्मानाबाद येथे भाषण करतानाचा त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. तर, देवेंद्र फडणवीसांमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याची आठवण सांगितली. फडणवीसांनी २०१७-१८ मध्ये मराठा समाजाची झोळी भरली. मराठ्यांना आरक्षण दिलं, टिकलं, दोन-तीन बॅचेस बाहेर आल्या, त्यांना नोकऱ्याही मिळाल्या. मात्र, २०१९ साली लोकांचा विश्वासघात करुन तुम्ही सत्तेत आलात, त्यानंतर सहाच महिन्यात आमचं आरक्षण गेलं, असे म्हणत सावंत यांनी राष्ट्रवादीवर प्रहार केला.
पुढील काही दिवसांत आणखीन नव्या मागण्या निघतील, आम्हाला एससीमधून आरक्षण द्या, आम्हाला ह्याच्यातून पाहिजे. पण, या मागचा कर्ता करविता कोण आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. हे सगळ्यांना माहिती आहे. पण फक्त कोणी बोलत नाही, असे म्हणत सावंत यांनी नाव न घेता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. दोनवर्षे आरक्षण गेल्यापासून तुम्ही गप्प आणि सत्तांतर झाल्यानंतर आता तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे म्हणत मराठा समाजाला उद्देशून सावंत यांनी भाषण केले. तसेच, होय आरक्षण आम्हाला पाहिजे, मलाही पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीलाही आरक्षण पाहिजे, आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही, असेही ते म्हणाले,
दरम्यान, सध्या तानाजी सावंत यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक मराठा समाजातील युवक नाराज असल्याचे सोशल मीडियातील पोस्टवरुन दिसून येते.