चैत्र पौर्णिमेसाठी भाविकांचे जत्थे तुळजापुरात; दर्शनासाठी महाद्वार टाळा, घाटशीळ मार्ग निवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 01:44 PM2022-04-15T13:44:32+5:302022-04-15T13:46:22+5:30
आज छबिना मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात
उस्मानाबाद : तुळजाभवानी देवीचा नवरात्रीनंतर सर्वात मोठा समजला जाणारा चैत्री पोर्णिमेचा उत्सव शुक्रवारी रात्री छबिना मिरवणुकीने सुरू होत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातील भाविकांचा ओघ तुळजापुरात सुरू झाला आहे. गुरुवारी दुपारपासून भाविकांचे जत्थे शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली.
तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी प्रतिदिन लाखाहून अधिक भाविक तुळजाभवानी चरणी नतमस्तक होत असतात. मागील दोन वर्षे मंदिर बंद राहिल्याने देवी भाविकांना या उत्सवाला मुकावे लागले होते. यावर्षी उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळाल्याने भाविकांमध्येही उत्साह आहे. यावेळी नेहमीपेक्षा जास्त भाविक या उत्सवासाठी दाखल होण्याचा मंदिर संस्थानचा अंदाज आहे. या अनुषंगाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. उत्सव कालावधीत देवीचे दर्शन तसेच इतर विधीसाठी दूर अंतरावर असणारे भाविक आतापासूनच दाखल होऊ लागले आहेत.
विशेषत: कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या भागातील भाविक गुरुवारपासूनच तुळजापुरात दाखल झाले आहेत. शिवाय, पंढरपूरच्या यात्रेचे भाविकही देवीच्या दर्शनासाठी आले आहेत. तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण समजल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीला खेटे घालण्यासाठी लाखो भाविक याच कालावधीत येरमाळा येथे जात असतात. हे भाविकही तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. यामुळे तुळजापूर शहर गजबजण्यास सुरुवात झाली आहे.
भवानी कुंड केले खुले...
चैत्र पौर्णिमा उत्सव कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. ही बाब लक्षात घेऊन मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सुविधांबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार भाविकांच्या सोयीसाठी भवानी कुंडाची साफसफाई करून ते गुरुवारपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले. हे कुंड नवरात्रीनंतर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. या कुंडात एकावेळी हजारावर भाविकांना थांबण्याची सोय आहे.
मोफत दर्शनासाठी केवळ घाटशीळ मार्ग...
लाखो भाविकांची उत्सव काळात हजेरी लागत असल्याने मंदिराच्या महाद्वारात गोंधळ उडतो. भाविकांना थांबण्यासाठी येथे पुरेशी जागा नसल्याने मंदिर समितीची तारांबळ उडते, तसेच भाविकांनाही मोठ्या गैरसायीला सामारे जावे लागते. त्यामुळे मोफत दर्शन रांग ही महाद्वारातून बंद करण्यात आली आहे. या भाविकांना पास देण्याची व मंदिरात सोडण्याची सोय ही सोलापूर रस्त्याकडील घाटशीळ मार्गावरून करण्यात आली आहे.