तुळजाभवानी देवीच्या शेषशाही महापूजेचे घेतले भाविकांनी दर्शन
By चेतनकुमार धनुरे | Published: October 20, 2023 03:55 PM2023-10-20T15:55:50+5:302023-10-20T15:56:19+5:30
भगवान विष्णू सागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना देवीने त्यांच्या नेत्र कमलात विश्राम घेतला.
तुळजापूर (जि.धाराशिव) : शारदीय नवरात्रातील सहाव्या माळेला श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा करण्यात आली. सकाळी नित्योपचार पूजा व अभिषेक पूजेनंतर मांडलेल्या या शेषशाही अलंकार महापूजेचे भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
या शेषशाही पूजेचे महत्व एका अख्यायिकेनुसार असे सांगितले जाते की, भगवान विष्णू सागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना देवीने त्यांच्या नेत्र कमलात विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मळापासून दोन दैत्य उत्पन्न झाले. त्यांची नावे शुंभ व निशुंभ. ते उत्पन्न होताच शेष शैयावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले. तेव्हा नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेवांनी विष्णूंच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तूती करुन तिला जागविले. यानंतर विष्णूवर आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध तुळजाभवानी मातेने केला. यामुळे विष्णूंनी आपली शेष शैय्या विश्राम करण्यासाठी श्री तुळजाभवानी मातेला दिली. यामुळेच देवीची ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते, असे सांगितले जाते. या पूजेचे हजारो भाविकांनी शुक्रवारी जयघोष करीत दर्शन घेतले.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळच्या नित्योपचार अभिषेकानंतर तुळजाभवानी देवीची रात्री उशिरा मयूर वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महंत, मंदिराचे विश्वस्त, भोपे पुजारी, प्रशासकीय व्यवस्थापक, धार्मिक व्यवस्थापक, गोंधळी सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.