आधी डोक्यात हातोडा घातला, नंतर गळा चिरला; प्रॉफिट शेअरिंगच्या वादातून मित्राचा खून केला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 11:33 AM2022-06-01T11:33:55+5:302022-06-01T11:36:41+5:30
ढाब्याची कमाई ठरली वादाचे कारण; शेअरिंगवरून अडून बसलेल्या मित्राचा केला खून
वाशी (जि. उस्मानाबाद) - ढाब्याच्या उत्पन्नाच्या वाटणीवरून सहकारी मित्राचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केला. ही धक्कादायक घटना ३१ मेच्या रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील येसवंडी शिवारातील मोटे यांच्या पेट्रोल पंपाजवळील ढाब्यावर घडली. घटनेची माहिती मिळताच तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या.
वाशी तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील येसवंडी शिवारात मोटे यांच्या पेट्रोल पंपाजवळ विश्वास गायकवाड यांच्या शेतात श्रीशाम शेखावटी राजस्थानी ढाबा आहे. हा ढाबा राजस्थान राज्यातीलअनुपसिंह शर्मा व अवनिश मान (रा.बिर, ता. पचेरी, जि. झुनझुनी) यांनी भागीदारीत चालवण्यास घेतला होता. अनूप व अवनिश या दोघांमध्ये नफा वाटणीच्या कारणावरून नेहमीच कुरबुरी होत होती. ३१ मे रोजी सकाळी ढाब्याच्या उत्पन्नतील पैसे वाटणीच्या कारणावरून बाचाबाची झाली. त्यावर अनूप शर्मा यांनी आज ढाबा उघडू नका, असे सांगून दिवसभर ढाबा बंद ठेवला. यानंतर अनूप यांने रात्री नऊ वाजेच्या सुमारास जेवण करून ढाब्यातील एक लाईट चालू ठेवली व बाकीच्या लाईट बंद करून खाटेवर झोपला.
साधारणपणे रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास अनूप झोपेत असतानाच अवनिश याने लोखंडी हातोड्यांने प्रहार करून गंभीर जख्मी केले. सदरील घटना ढाब्यावरील कामगारांनी पाहिली असता, धावत जाऊन त्याच्या हातातील हातोडा घेऊन बाजूलाच असलेली शेडलगत फेकून दिला. तेव्हा ''तुम्ही मध्ये पडू नका'' आशा शब्दात अवनिश याने कामगारांना दम दिला. त्यामुळे ढाब्यावरील कामगार दूर गेले. कामगार दूर गेल्याचे पाहून किचनमधिल धारधार बतई आणून त्यांने अनुपचा गळा कापला.
हा थरार पाहून ढाब्यावर कामास असलेला आचारी मन्ना जगदीश याने आरडाओरड केली. यानंतर ढाब्यावरील कामगार व बाजूच्या पेट्रोल पंपावरील काही धावत आले. लोक लयाचे पाहून पळून जाण्याच्या तयारीत असलेला अविनाश मान यास पकडून ठेवले. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली असता, पोलीस निरीक्षक सुरेश दळवे, पोउपनी पवन निंबाळकर, किशोर काळे, प्रियांका फड हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व आरोपीस गजाआड केले. यानंतर जागीच मयत झालेल्या अनूप शर्मा याचे शव पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. पंचनामा झाल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली.