कळंब शहरात आता ‘धाड गँग’ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:33 AM2021-09-11T04:33:09+5:302021-09-11T04:33:09+5:30

कळंब : ‘हप्ते द्या, नाहीतर तुमच्या धंद्यावर धाड पडेल’, अशी धमकी देऊन पैसे उकळणारी टोळी आता शहरात कार्यरत झाली ...

‘Dhad Gang’ in Kalamb city now? | कळंब शहरात आता ‘धाड गँग’ ?

कळंब शहरात आता ‘धाड गँग’ ?

googlenewsNext

कळंब : ‘हप्ते द्या, नाहीतर तुमच्या धंद्यावर धाड पडेल’, अशी धमकी देऊन पैसे उकळणारी टोळी आता शहरात कार्यरत झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शहरात अनेक अवैध धंदे चालू असल्याच्या तक्रारी विविध पक्ष संघटनांनी अनेकदा प्रशासनाकडे केल्या. काही दिवसांपूर्वी भाजपने हे धंदे बंद करण्यासाठी मोठा मोर्चा काढला. त्यामुळे भाजप युवा मोर्चाच्या शहराध्यक्षावर हल्लाही झाला. त्यानंतर किती अवैध धंद्यावर संबंधित बिटचे कर्मचारी, स्थानिक पोलीस प्रशासन, स्थानिक गुन्हे अन्वेषण, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत कार्यवाही झाली, याची माहिती समोर आली नाही. याउपरही शहरात सध्या मुख्य बाजारपेठेत तसेच गल्लोगल्ली या धंद्यांनी चांगलेच हातपाय पसरले आहेत. हे चालू ठेवण्यासाठी ऑफ रेकॉर्ड काही ‘कलेक्टर’ मध्यस्थीचे काम करत असल्याची माहिती आहे. त्यांनीही पूर्वीचे लमसम आकडे न ठेवता आता रेटकार्ड ठरवून दिले आहे.

दरम्यान, शहरात आता या अवैध धंदेवाल्यांसाठी एक नवीन ‘धाडगँग’ डोकेदुखी बनल्याची चर्चा आहे. अवैधधंदे असतील किंवा काही चुकीची घटना घडली असेल तर ही मंडळी तेथे जाऊन सेटलमेंट करा नाहीतर तुमच्या धंद्यावर धाड पडेल, अशी धमकी देऊन पैसे उकळत असल्याची माहिती आहे. काहींनी अगोदरच पैसे दिले आहेत म्हणून पैसे द्यायला नकार दिला तर त्यांच्यावर कार्यवाही झाल्याचीही चर्चा दोन नंबर व्यवसायात आहे. त्यांचे हात ‘वरपर्यंत’ पोहोचल्याचा दावा ते करत असल्याने धंदा नको, पण हप्ता आवर, असे म्हणण्याची वेळ आल्याचे ही मंडळी सांगतात.

चौकट -

नवीन अधिकाऱ्यांना शिस्त लावावी लागेल

कळंब पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी यशवंत जाधव यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्यावर आता शहरातील या कथित गँगच्या करामती बंद करण्याबरोबर कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्याची जबाबदारी असणार आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे पदही मागील काही दिवसांपासून रिक्त आहे. तेथेही अधिकारी नियुक्त झाल्यास पोलिसांच्या नावावर होणारे गैरप्रकार थांबू शकतील. शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांचीही खांदेपालट करण्याची आवश्यकता शहरवासीयांतून व्यक्त होते आहे.

चौकट -

टीप एकाची, कार्यवाही दुसरीकडे!-

काही दिवसांपूर्वी आठवडी बाजार परिसरातील मोठ्या जुगार अड्ड्याची टीप एका टीमला मिळाली होती, ती टीम तेथे पोहोचलीही मात्र त्या अड्ड्यावर कार्यवाही न करता दुसरीकडेच छापा मारून टीम परतल्याची चर्चा आहे.

Web Title: ‘Dhad Gang’ in Kalamb city now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.