एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; महामार्ग राेखला अन् मेंढ्याही साेडल्या !
By बाबुराव चव्हाण | Published: September 26, 2023 05:46 PM2023-09-26T17:46:56+5:302023-09-26T17:47:58+5:30
संतप्त बांधवांनी महामार्गावर मेंढ्या साेडून ‘‘सत्तर वर्षे सहन केलं, यापुढे चालणार नाही’’, अशा शब्दात सरकाला गर्भित इशाराही दिला.
धाराशिव : ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं’,‘यळकोट यळकोट जय मल्हार’,‘ना नेता, ना पक्ष, धनगर आरक्षण हेच लक्ष’ अशा घाेषणा देत मंगळवारी धनगर बांधवांच्या वतीने ‘एसटी’ आरक्षणाच्या मागणीसाठी चाेराखळी पाटी येथे साेलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग राेखला. संतप्त बांधवांनी महामार्गावर मेंढ्या साेडून ‘‘सत्तर वर्षे सहन केलं, यापुढे चालणार नाही’’, अशा शब्दात सरकाला गर्भित इशाराही दिला.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजबांधवांच्या वतीने चाैंढी येथे आंदाेलन सुरू आहे. या आंदाेलनाला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी साेलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाेराखळी पाटी येथे धनगर बांधवांच्या वतीने रास्ताराेकाे आंदाेलन करण्यात आले. यानंतर संतप्त बांधवांनी महामार्गावर मेंढ्या साेडून सरकारच्या भूमिकेचा निषेध नाेंदविला. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे, यासाठी मागील ७० वर्षांपासून संघर्ष करीत आहाेत. मात्र, सरकारने प्रत्येकवेळी आश्वासन देण्यापलीकडे काहीच केले नाही. प्रत्येकवेळी आश्वासनावर बाेळवण केली. आम्ही सत्तर वर्षे सहन केलं, यापुढे चालणार नाही, असा इशाराही यावेळी धनगर बांधवांनी दिला. दरम्यान, आंदाेलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली हाेती.