धाराशिव जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा; फळबागा अन् रबी पिकांचे नुकसान
By बाबुराव चव्हाण | Published: March 18, 2023 04:25 PM2023-03-18T16:25:44+5:302023-03-18T16:26:51+5:30
काढणीला आलेली आणि काढणी हाेवून शेतातच असलेल्या पिकांचे माेठे नुकसान झाले आहे.
धाराशिव : जिल्ह्यातील कळंब, उमरगा तसेच धाराशिव तालुक्यातील काही भागात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह गारपीट झाली. या गारपीटीमुळे फळबागांसाेबतच रबी हंगामातील काढणीला आलेला पिकांना माेठा फटका बसला.
दाेन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण हाेते. शुक्रवारी रात्री काही भागात पाऊस झाला. दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच आभाळ दाटून आले हाेते. दुपारी २ वाजेच्या सुमारास कळंब तालुक्यातील रांजणी, शिराढाेण, सात्रा शिवारात गारपीट झाली. तर दुपारी ३ वाजेच्या सुमारास धाराशिव तालुक्यातील येडशी व उमरगा तालुक्यातील काही गावांना गारपीटीने तडाखा दिला. शेतात अन् रस्त्यांवरही गारांचा खच निर्माण झाला हाेता. गारपीटीच्या तडाख्याने फळबागांसाेबतच रबी हंगामातील काढणीला आलेली आणि काढणी हाेवून शेतातच असलेल्या पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.