धाराशिवच्या सरपंचावर हल्ला झालाच नाही; बंदुकीच्या लायसन्ससाठी स्वत:च रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 18:49 IST2025-01-02T18:48:06+5:302025-01-02T18:49:06+5:30

बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी सरपंच व मित्राने रचला हल्लायाचा बनाव, पोलिसांसमोर दिली कबुली.

Dharashiv sarpanch was not attacked; he fabricated it for a gun license | धाराशिवच्या सरपंचावर हल्ला झालाच नाही; बंदुकीच्या लायसन्ससाठी स्वत:च रचला बनाव

धाराशिवच्या सरपंचावर हल्ला झालाच नाही; बंदुकीच्या लायसन्ससाठी स्वत:च रचला बनाव

धाराशिव: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हदरला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच धाराशिवमधील एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर आली होती. पण, आता या घटनेत एक नवा ट्विस्ट आला आहे. सरपंच नामदेव निकम यांनी बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. 

तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर 26 डिसेंबरच्या रात्री हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. दोन दुचाकींवरुन आलेल्या चार अज्ञातांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा दावा निकम यांनी केला. कारच्या काचेवर अंडी, दगड, पेट्रोल भरलेले फुगे मारले आणि मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला होता. हा प्रकार पवनचक्की प्रकरणाशी निगडित असावा, असा संशय व्यक्त करून निकम यांनी तुळजापूर पोलिसांकडे चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

घटनास्थळाची सूक्ष्म पाहणी करून पोलिसांनी पंचनामा केला. शिवाय, या प्रकरणात तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात आली. मात्र, हल्लेखोराचा मागमूस काही केल्या लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सरपंच नामदेव निकम व घटनेवेळी सोबत असलेला त्यांचा मित्र प्रवीण इंगळे यांची उलटतपासणी घेतली. त्यांनी सांगितलेला घटनाक्रम व घटनास्थळावरील परिस्थितीशी जुळत नव्हती. त्यामुळे खोलात जाऊन तपासणी केल्यानंतर दोघांनीही आपणच हा बनाव केल्याचे कबूल केल्याची माहितीही पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. 

स्वत:च केली वाहनाची तोडफोड...
फिर्यादी सरपंच नामदेव निकम यांचा पुण्यात ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. बहुतांश वेळ ते पुण्यातच असतात. ते बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. मस्साजोगचे प्रकरण तापलेले असल्याने यात हा परवाना मिळणे सोपे होईल, असा कयास लावून निकम यांनी मित्र प्रवीण इंगळेसह हल्ल्याचा बनाव रचला. त्यांच्या वाहनाची निकम यांनी स्वत:च तोडफोड केल्याचेही चौकशीतून समोर आले आहे. 

 

Web Title: Dharashiv sarpanch was not attacked; he fabricated it for a gun license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.