उस्मानाबादेत अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी धोबी समाजाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 07:21 PM2018-12-17T19:21:18+5:302018-12-17T19:22:19+5:30
समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़
उस्मानाबाद : धोबी (परिट) समाजाचा पूर्ववत अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र धोबी (परिट) समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी ‘आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा’, ‘परिट समाजाचा अनुसूचित जातीत समावेश झालाच पाहिजे’, ‘संत गाडेबा बाबा यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता़ शिवाय ‘गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा’चाही जयघोष आंदोलकांनी केला़ देशातील विभिन्न राज्यात धोबी समाज कपडे धुण्याचे काम करत आहे़ इतर राज्यात वास्तव्यास असलेल्या धोबी समाजाचे राहणीमान सारखेच आहे़
इतर सतरा राज्यात धोबी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश आहे़ १९६० अगोदर महाराष्ट्रातील बुलढाणा व भंडारा जिल्ह्यात अनुसूचित जातीमध्ये धोबी समाज होता़ मात्र, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर धोबी समाजाला ओबीसी प्रवर्गात टाकण्यात आले़ समाजाची वाढती नाराजी पाहून शासनाने २३ मार्च २००१ साली डॉ़ डी़ एम़ भांडे यांच्या अध्यक्षतेखाली धोबी समाज पुर्नविलोकन समिती गठीत केली
धोबी समाजाचा अभ्यास करुन समितीने अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची शिफारस केली होती़ तो भांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारसीसह केंद्राला पाठवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली़ यावेळी महेश धोंगडे, विजय धोंगडे, राजाभाऊ काशीद, व्यंकटेश जाधव, संजय पवार, विनोद सरपाळे, संजय वाघमारे, सुरेखा काशिद यांच्यासह समाज समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.