ढोकीत मराठा समाजबांधव उतरले रस्त्यावर; लातूर-बार्शी महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प
By गणेश कुलकर्णी | Published: September 11, 2023 05:11 PM2023-09-11T17:11:52+5:302023-09-11T17:12:04+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरिता आंदोलन
धाराशिव : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज व गोळीबारप्रकरणी तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील ढोकी येथील लातूर-बार्शी महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरिता ढोकीसह परिसरातील गावातून संग्राम देशमुख, सतीश वाकुरे, प्रमोद देशमुख (ढोकी), प्रज्वल हुंबे, मुकेश जाधव (देवळाली), शिवाजी बेडके (गोवर्धनवाडी), जीवन कावळे (कावळेवाडी), किशोर शेंडगे (तुगाव) आदंनी येथे बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे. सोमवारी उपोषणाचा तिसरा दिवस असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज लातूर- बार्शी महामार्ग रोखण्यात आला.
या रास्ता रोकोसाठी सोमवारी सकाळी ९ वाजेपासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाजबांधव जमा होण्यास सुरुवात झाली होती. सकाळी ११ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी केली. बबन देशमुख यांनी प्रास्ताविक केले, तर चिंतामणी कावळे, तानाजी जमाले, गुणवंत देशमुख, ॲड. धनंजय दुधगावकर, उपसरपंच अमोल समुद्रे यांनी विचार मांडले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश व महसूलचे मंडळ अधिकारी नागनाथ नागटिळक, ढोकीचे तलाठी संजय माळी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ढोकी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.