पूल उभारणीचा मुहूर्त मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:29 AM2021-01-18T04:29:06+5:302021-01-18T04:29:06+5:30
येणेगूर : राष्ट्रीय महामार्गावरील दस्तापूर गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी गावानजीक पूल उभारण्यासाठी महिनाभरापूर्वी लोखंडी सांगाडे आणून टाकण्यात आले, ...
येणेगूर : राष्ट्रीय महामार्गावरील दस्तापूर गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी गावानजीक पूल उभारण्यासाठी महिनाभरापूर्वी लोखंडी सांगाडे आणून टाकण्यात आले, परंतु प्रत्यक्ष कामाला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दस्तापूर गाव महामार्गाच्या दोन्ही बाजूला वसले असून, दक्षिणेकडून उत्तरेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे ये-जा करताना सातत्याने अपघात होतात. यात काहींचे बळीही गेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत होती. या पुलासाठी ग्रामस्थांनी उपोषण, रास्ता रोको आंदोलनेही केली.
अखेर प्रशासनाने येथील जि.प. शाळेसमोर गतवर्षी एक कोटी रुपये खर्चून लोखंडी पुलाचे भूमिपूजन केले होते. हे काम सोलापूर येथील एका कंत्राटदारांस देण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात लॉकडाऊनमुळे कामात व्यत्यय आला होता. अनलॉकनंतर संबंधित गुत्तेदाराने प्रत्यक्ष कामास सुरुवात करून, या ठिकाणी लोखंडी सांगाडे आणून ठेवले. यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागेल, अशी आशा ग्रामस्थांना होती, परंतु मागील महिनाभरापासून याबाबत पुढे कुठलीच कार्यवाही झाली नाही. रस्त्यालगत ठेवलेले सांगाडे, तसेच पडून असून, यामुळे वाहतुकीलाही अडथळा होत आहे. विशेष म्हणजे, सोलापूर ते कर्नाटक सीमेपर्यंतच्या १०१ किलोमीटर अंतरात केवळ दस्तापूर गावासाठी लोखंडी पूल बांधण्यात येत आहे, परंतु याचेही काम रखडल्याचे ग्रामस्थ जगन पाटील, ज्ञानेश्वर डोंगरे, श्रीनिवास बुर्रा यांनी सांगितले.
चौकट....
वीज वाहिन्यांचा येतोय अडथळा
या संदर्भात सोलापूर महामार्ग प्राधिकरणचे लायनिंग अभियंता रमेश काळे यांच्याशी संपर्क साधला असता, हा लोखंडी पूल उभा करताना नजीक असलेल्या विजेच्या तारांचा अडथळा येत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीला ही वीज वाहिनी भूमिगत करून घेण्याबाबतचा प्रस्ताव दिला असून, हा अडथळा दूर झाल्यानंतर पुलाचे काम त्वरित चालू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.