ना गळाभेट झाली, ना शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:31 AM2021-05-15T04:31:04+5:302021-05-15T04:31:04+5:30
मुरूम : शहर व परिसरातील बहुतांश मुस्लिम बांधवांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत सलग दुसऱ्या वर्षी रमजान ईद साधेपणानेच साजरी ...
मुरूम : शहर व परिसरातील बहुतांश मुस्लिम बांधवांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत सलग दुसऱ्या वर्षी रमजान ईद साधेपणानेच साजरी केली. त्यामुळे ना गळाभेट झाली, ना शिरखुर्मा मिळाला. जुन्याच कपड्यांवर यंदाची ईद मुस्लिम बांधवांना साजरी करावी लागली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातले आहे. शहरी, तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारकडून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंधरा एप्रिलपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूची संख्याही अधिक असल्याचे दिसून येत आहे. या लॉकडाऊनच्या काळातच मुस्लिम समाजाचा पवित्र महिना असलेला रमजान महिना सुरू होता. संपूर्ण रमजान महिना संपला तरी परिसरात बहुतांश मशिदींना टाळेच असल्याचे दिसून आले. किमान रमजान ईदची नमाज तरी ईदगाह मैदानावर होईल, अशी मुस्लिम बांधवांना आशा होती. मात्र, काेराेनाचे संकट कमी न झाल्याने सरकारने लॉकडाऊनची मुदत एक जूनपर्यंत वाढविल्याने मुस्लिम बांधवांना ईदची नमाज घरीच अदा करावी लागली. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने अनेक मुस्लिम नागरिकांना ना कपडे मिळाले, ना शिरखुर्म्याचा मसाला. त्यामुळे बहुतांश नागरिकांना यंदाची ईद साधेपणाने साजरी करावी लागली. शुक्रवारी ईदची नमाज होती. ही नमाजदेखील मुस्लिम बांधवांनी शासनाचे नियम पाळून अदा केली. त्यामुळे प्रत्येक वर्षी ईदगाह मैदान आणि मशिदीत होणारी नमाज यंदा मात्र घरातच अदा करून केवळ कुटुंबासोबतच ईद साजरी करावी लागली. त्यामुळे ना मित्र आले, ना नातेवाईक. कोरोनामुळे नमाजनंतर गळाभेट न घेता दुरूनच एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि केवळ कुटुंबातील बोटावर मोजण्या इतक्याच लोकांनी शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला.