आगळीवेगळी धुंड सणाची प्रथा, इथे फोकारीने बदडून साजरा होतो पूत्र प्राप्तीचा आनंद
By गणेश कुलकर्णी | Published: March 8, 2023 05:06 PM2023-03-08T17:06:26+5:302023-03-08T17:09:25+5:30
लमाण समाजातील धुंड सणाची आगळीवेगळी पारंपरिक प्रथा
नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : पूत्रप्राप्ती झाल्यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी आयोजित केलेल्या हंडीतील खीर लुटण्याचा व ती लुटताना महिलांचा फोकारीने मार खाण्याचा धुंड सण मंगळवारी सायंकाळी येथील वसंत नगरातील लमाण समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला.
लमाण समाजात होळी सणाअगोदर चार महिन्यांच्या आत किंवा सणालगत (यापैकी जे अगोदर आहे त्या कालावधीत) ज्याला पूत्र प्राप्ती होते ते कुटुंब तांड्यातील सेवालाल महाराज मंदिरासमोर पशुधन बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खुंट्यांना खिरीने भरलेला तांबा धातुचा हंडा बांधून त्याला फुलांची माळ घालून सजवून लुटण्यासाठी तयार ठेवतात. यानंतर तांड्यातील नाईक, कारभारी व कार्यकर्ते पारंपरिक पोशाखात खीर हंडी लुटण्यासाठी येतात. याचवेळी महिला लेंहगी परिधान करून नृत्य व गायन करीत हातात लाकडाची लहान फांदी (फोक) घेऊन हंड्याच्या संरक्षणासाठी खीर हंडी बांधलेल्या ठिकाणी येतात.
वीस - पंचवीस महिलांच्या हातातील फोकारीचा मार चुकवत दोन खुंट्याला दोरीने बांधलेला खिरीचा हंडा युवक व पुरूषांनी सोडवून घेऊन धुलीवंदन साजरा केला जातो. यावर्षी तांड्यातील शुभम संजय राठोड यांना होळी सणाच्या चार महिन्यांच्या आत पूत्रप्राप्ती झाल्याने त्यांनी धुंड सणाकरिता खिरीच्या हंडीची व्यवस्था केली होती. पारंपरिक विधिवत पूजेनंतर पन्नास - साठ पुरूष एका बाजुला व तीस - पस्तीस स्त्रिया दुसऱ्या बाजूला उभे राहून हंडी लुटण्याचा व त्याला प्रतिकार करण्याचा जिद्दीचा खेळ खेळत होते. पाठीवर फोकारीचे मार झेलत व सहन करीत तरूण बालाजी धनसिंग जाधव, जेथा सुखदेव राठोड, गणेश मानसिंग राठोड, मानसिंग गोरा राठोड, करण लक्ष्मण चव्हाण, विनायक हरिभाऊ जाधव आदींनी हंडी पळवून त्यातील खीर काला म्हणून उपस्थितांना वाटप केली.
हा आगळावेगळा पण पारंपरिक सण साजरा करण्यासाठी नाईक फुलचंद राठोड, कारभारी विनायक जाधव, वैभव जाधव, माजी नगरसेवक निरंजन राठोड, छमाबाई राठोड, झिमाब राठोड, ललिता राठोड तसेच भानुदास राठोड, मानसिंग राठोड, चंद्रकांत राठोड, कानिराम राठोड, दिलीप राठोड, मोतीराम राठोड, रवी राठोड, चंदू जाधव, सुरेश राठोड, संजय जाधव, बाबू राठोड, लक्ष्मण चाव्हण, सुशीला जाधव, विमलबाई जाधव, भारताबाई राठोड, अनिता राठोड, शांताबाई जाधव, कमळाबाई राठोड, चिमाबाई राठोड, गुणाबाई जाधव आदी उपस्थित होते.
स्त्रियांच्या स्वरक्षणार्थ वापर
लमाण समाज हा गावकुसाबाहेर तांडा करून राहणारा व श्रम करणारा समाज आहे. बऱ्याच वेळा पुरूष घराबाहेर असतात. त्या काळात स्त्रियांनी स्वतःचे व मालमत्तेचे संरक्षण करावे, या उद्देशाने धुंड सण साजरा केला जातो. यात दोरीने खुंटीला बांधलेला हंडा पळविण्यामुळे पुरुषातील कर्तृत्व व हंड्याला हात न लावू देण्याच्या प्रवृत्तीमुळे स्त्रीची प्रतिकार करण्याची वृत्ती यातून प्रदर्शित होते.