जाचक आदेशामुळे कष्टकऱ्यांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:46+5:302021-04-01T04:32:46+5:30
उस्मानाबाद : लॉकडाऊनच्या आडून जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या जाचक आदेशामुळे कष्टकरी, मजूर, गरीब जनता अडचणीत सापडत आहे. त्यामुळे हे आदेश तत्काळ ...
उस्मानाबाद : लॉकडाऊनच्या आडून जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या जाचक आदेशामुळे कष्टकरी, मजूर, गरीब जनता अडचणीत सापडत आहे. त्यामुळे हे आदेश तत्काळ रद्द करावेत, अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व चहा टपऱ्या बंद केल्या. यामुळे यावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांच्या कामावर गंडांतर आले आहे. यापूर्वीच्या लॉकाऊन काळात हाताला काम नसल्यामुळे अनेक महिलांनी आपले दागदागिने गहाण ठेवून व मोडून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता त्यांच्याकडे कुठलेही साधन नाही. त्यामुळे आताच्या परिस्थितीत कोरोनापेक्षा उपासमारीने लोकांचा जीवन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊननंतर पोटाला चिमटा घेऊन बँका, पतसंस्था, पतपेढ्या, बचत गट व खासगी फायनान्स यांच्याकडून घेतलेले कर्ज परत फेडण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, या लॉकडाऊनमुळे पुन्हा हे अर्थचक्र थंडावल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे हा आदेश तत्काळ रद्द करून जनतेला खुलेआम जगण्याची परवानगी द्यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावर जिल्हाध्यक्ष राजभाऊ ओव्हाळ यांच्यासह रिपाइंचे जिल्हा संघटक सचिव प्रताप कदम, मराठवाडा उपाध्यक्ष आनंद पांडागळे आदींच्या सह्या आहेत.
चौकट.......
रात्री १० वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवा
भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी आठवड्याची हक्काची असलेली बाजारपेठ बंद करून शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय केला आहे. जनावरांचे दूध सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास काढले जाते. ते विक्री करण्यासाठी आपण बंदी केल्यामुळे त्या दुधाची अक्षरश: नासाडी होत आहे, शिवाय सायंकाळी ७ वाजल्यानंतर जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे मोलमजुरीच्या कामावरून सुट्टी झाल्यानंतर भाजीपाला, तेल, मीठ, मिरची व जीवनावश्यक साहित्य कुठे व कसे खरेदी करायचे, असा प्रश्नही सर्वसामान्यांना सतावत आहे. त्यामुळे रात्री किमान १० वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.