पोलीस निवासस्थानाची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:21 AM2021-07-12T04:21:19+5:302021-07-12T04:21:19+5:30
आंबी : भूम तालुक्यातील आंबी येथील पोलीस निवासस्थानांची मोठी दुरावस्था झाली असून, यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. पोलीस ठाण्यात ...
आंबी : भूम तालुक्यातील आंबी येथील पोलीस निवासस्थानांची मोठी दुरावस्था झाली असून, यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक फौजदार असे दोन अधिकारी कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांसमावेत ५० कर्मचारी कार्यरत आहेत; परंतु, आंबी येथे त्यांना राहण्यासाठी केवळ १७ निवासस्थाने आहेत. त्यातील एक अधिकाऱ्यांसाठी तर उर्वरित १६ निवासस्थाने कर्मचाऱ्यांसाठी आहेत. त्यामुळे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना भाड्याच्या घरात राहावे लागते.
दरम्यान, उपलब्ध असलेल्या निवासस्थानांचीही सध्या मोठी दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात जवळपास सर्वच निवासस्थानाला गळती लागत असून, त्यामुळे छतावर ताडपत्री टाकून तात्पुरती गळती थांबवावी लागत आहे शिवाय, भिंतीमध्ये पाणी झिरपून पाझर फुटत आहे. त्यातून भिंतीमध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. शिवाय, येथे राहणाऱ्या पोलीस कुटुंबीयांना परिसरातील अस्वच्छतेचा देखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व बाबींकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन घरांची संख्या वाढवावी तसेच जुन्या घरांची दुरूस्ती करून ते वापरण्यायोग्य बनवावेत, अशी मागणी होत आहे.
चौकट....
आंबी येथे पोलीस कर्मचाऱ्यांच्या तुलनेत उपलब्ध निवासस्थानांची संख्या अपुरी असून, उपलब्ध निवासस्थानांचीही दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे.
- आशिष खांडेकर, पोलीस निरीक्षक, आंबी