घृणास्पद ! कोरोना निगेटिव्ह असतानाही वडिलांचा मृतदेह मुलाने नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:09 PM2020-05-27T19:09:08+5:302020-05-27T19:16:00+5:30
शेवटी उस्मानाबाद पालिकेने केला अंत्यविधी
उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाल्यानंतर एका वृद्ध व्यक्तीच्या मुलाने भितीपोटी मृतदेह तेथेच सोडून पोबारा केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे़ अंत्यविधीस कोणीही समोर येत नसल्याने अखेर पालिका कर्मचाऱ्यांनीच बुधवारी दुपारी या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले़
कोरोनामुळे नात्यातील अन् मनामनातील अंतरही वाढीस लागल्याची उदाहरणे आता समोर येऊ लागली आहेत़ वार्धक्याने जरी मृत्यू झाला तरी मयत व्यक्तीच्या अंत्यविधीला नाना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे़ विशेषत: ग्रामीण भागात कोरोनाचा मोठाच धसका लोकांनी घेतला आहे़ त्याची झळ मयताच्या कुटूंबियांनाही सोसावी लागत आहे़ याचेच एक उदाहरण बुधवारी उस्मानाबादेतील घटनेवरुन समोर आले़ परंडा तालुक्यातील एका ७० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना परंडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तेथून पुढील उपचारासाठी त्यांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले़ उपचार सुरु असताना या व्यक्तीची कोरोना टेस्ट करण्यात आली़ त्याचा अहवाल निगेटीव्ह आला.
मात्र, त्या व्यक्तीने उपचारादरम्यानच दोन दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला़ उपचार सुरु असताना या व्यक्तीचा मुलगा त्यांच्यासोबतच होता़ मात्र, मृत्यू झाल्यानंतर त्याने मृतदेह रुग्णालयातच सोडून एकट्यानेच गाव गाठले़ गावाकडे अंत्यविधीस विरोध होईल, मृतदेह नेता येणार नाही, असे आगतिकपणे सांगून त्याने गुपचूप रुग्णालय सोडले़ मयताच्या कुटूंबियांशी संपर्क केल्यानंतरही त्यांनी मृतदेह स्विकारण्यास असमर्थतता दर्शविल्याने नाईलाजास्तव पोलिसांनी उस्मानाबाद पालिकेला अंत्यविधीसाठी आर्जव केले़ पालिका कर्मचाऱ्यांनी मग पुढाकार घेऊन मयतावर सार्वजनिक स्मशानभूमीत बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार केले़ या घटनमुळे कोरोनाने निर्माण केलेली भिती, अंधविश्वास अन् मनामनात निर्माण केलेली दरी अधोरेखित झाली आहे़
अंत्यविधीसही झाला होता विरोध़
उस्मानाबाद पालिकेकडून बेवारस असलेल्या मृतदेहांवर वेळोवेळी अंत्यसंस्कार केले जातात़ यासाठी शहरालगतचीच एक शासकीय जागा निश्चित केलेली आहे़ त्यामुळे याहीवेळी नेहमीप्रमाणे या जागेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका कर्मचारी मृतदेह घेऊन गेले़ मात्र, याच भूखंडावर वास्तव्य करुन राहिलेल्या काही नागरिकांनी असंवेदनशीलतेचे प्रदर्शन करीत अंत्यविधीस विरोध केला़ परिणामी, तो मृतदेह घेऊन कर्मचारी सार्वजनिक स्मशानभूमीत गेले अन् तेथेच अंत्यविधी केला़
मानवतेची भूमिका घेतली पाहिजे़
कोरोनामुळे आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही़ शिवाय, मृत्यू झाला तरी यंत्रणा मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देत नाही़ त्यामुळे एखाद्या अन्य आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मरणोपरांत सामाजिक छळ होणे उचित नाही़ अशा प्रकारचे ‘सोशल डिस्टन्स’ मानवी मनाला यातना देते़ त्यामुळे कोणताही गैरसमज करुन घेऊन मृतदेह बेवारस सोडणे, अंत्यविधीस विरोध करणे योग्य नाही़ नागरिकांनी सांमजस्याची, मानवतेची भूमिका घेतली पाहिजे़
- मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष, उस्मानाबाद