निवडणुकीच्या तोंडावर गुजरातला उद्योगधंदे दिले, आता कर्नाटकला गावे देतील: सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 01:53 PM2022-12-07T13:53:04+5:302022-12-07T13:53:30+5:30
सीमावर्ती भागातील वाद, भाजपने रचलेले षडयंत्र असल्याचा हल्लाबोल उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला
उस्मानाबाद : महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मंगळवारी जो प्रकार घडला तो निषेधार्ह आहे. मात्र, या सगळ्या वादामागे भाजप असून, त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी उस्मानाबादेत केला.
प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने उस्मानाबादेत आलेल्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, गुजरातच्या निवडणुका होत्या तेव्हा येथील उद्योगधंदे भाजपने गुजरातला जाऊ दिले. आता लवकरच कर्नाटक राज्याच्या निवडणुका लागणार आहेत. अशावेळी सीमावर्ती भागातील महाराष्ट्रातील गावे कर्नाटकात जाऊ द्यायची, असा भाजपचा डाव आहे. यासाठीच ते मिळून सीमेवर वाद पेटवीत आहेत. यामागे मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचाही डाव आहे. महाराष्ट्र अस्थिर करायचा. ज्यामुळे भविष्यात येथे उद्योग येण्यास धजावणार नाहीत. येथील लोक महागाई, बेरोजगारी यासारख्या विषयांवर प्रश्न विचारणार नाहीत, असा महाराष्ट्र या भाजपवाल्यांना बनवायचा आहे. त्यामुळे ते असे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला.
मनसेला इशारा
मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने अंधारे यांच्या सभा उधळून लावण्याचा इशारा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्याने दिला होता. यावर त्या म्हणाल्या, माझी एक सभा झालीही. आणखी दोन सभा जिल्ह्यात होत आहेत. करून दाखवा. इलाका तुम्हारा हो तो धमाका हमारा है, अशा शब्दांत मनसेचा इशारा त्यांनी धुडकावून लावला. यावेळी खा. ओम राजेनिंबाळकर, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर व पदाधिकारी उपस्थित होते.