जिल्हाधिकाऱ्यांनी केली कृषी सेवा केंद्राची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:31+5:302021-06-09T04:40:31+5:30
जिल्ह्यास पेरणी क्षेत्रानुसार महाबीजकडून १२ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे पुरवठा झालेला आहे. महाबीजचे सोयाबीन बियाणाचे दर खासगी कंपनीपेक्षा कमी ...
जिल्ह्यास पेरणी क्षेत्रानुसार महाबीजकडून १२ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे पुरवठा झालेला आहे. महाबीजचे सोयाबीन बियाणाचे दर खासगी कंपनीपेक्षा कमी असल्याने महाबीज बियाणाची शेतकऱ्यांकडून मागणी जास्त आहे. त्यानुसार महाबीजकडे सोयाबीन पुरवठा करण्याबाबत प्रयत्न चालू आहेत. आजअखेर कृषी सेवा केंद्रात महाबीज सोयाबीन बियाणाची उपलब्धता कमी असली तरी खासगी सोयाबीन बियाणे कंपन्याचा पुरवठा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणाची काळजी करण्याची आवश्यकता नाही, असे दिवेगावकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी बियाणे उगवणशक्ती तपासून व बियाण्याला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले.
त्याचप्रमाणे पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय म्हणजे ७५ ते १०० मि.मी पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी, असेही त्यांनी सांगितले. कृषी सेवा केंद्रामार्फत उपलब्ध असलेले विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाण्यांबाबत उगवणशक्ती प्रात्यक्षिक पाहणी केली. त्याचप्रमाणे अनुदानित खताचा वापर पॉस मशीनद्वारे होत असल्याची, तसेच केंद्र शासनाने २० मे २०२१ रोजी अनुदानित खतास वाढीव अनुदान जाहीर केले असल्याने सुधारित दराने खताची विक्री होतेय की नाही, तसेच कृषी सेवा केंद्र व गोदामात उपलब्ध असलेले बियाणे, खते यांची दरफलकावर अद्ययावत साठ्याची नोंद केली आहे का नाही याचीही तपासणी केली.
यानंतर इतरही कृषी सेवा केंद्राची प्रत्येक तालुक्यात रँडम तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना बियाणे, खताबाबत काही अडचण असल्यास तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात यावी. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा दर्जेदार व रास्त दरात मिळण्याकरिता बियाणे, खते, कीटकनाशक कायद्यानुसार निरीक्षकांनी नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीस पाठविणे व भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यु. आर. घाटगे, कृषी विकास अधिकारी जि. प. टी. जी. चिमनशेट्टे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सी. जी. जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी बी. आर. राऊत, व्ही. एस. निरडे उपस्थित होते.