खरीप हंगामासाठी सूक्ष्म नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:33 AM2021-04-27T04:33:05+5:302021-04-27T04:33:05+5:30

उस्मानाबाद : कोविड महामारीचे संकट कमी झाल्यानंतर शेतकरी आणि व्यावसायिक बांधवांना खऱ्या अर्थाने अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. ...

Do meticulous planning for the kharif season | खरीप हंगामासाठी सूक्ष्म नियोजन करा

खरीप हंगामासाठी सूक्ष्म नियोजन करा

googlenewsNext

उस्मानाबाद : कोविड महामारीचे संकट कमी झाल्यानंतर शेतकरी आणि व्यावसायिक बांधवांना खऱ्या अर्थाने अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे याची तीव्रता कमी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कर्ज, पीकविमा नोंदणी, पीक विम्याची एकूण, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक बियाणे व खत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने आतापासून प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. ज्ञानराज चौगुले, आ. राणाजगजीतसिंह पाटील, आ. कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी.के. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी हणमंत वडगावे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, कृषी विभागाने प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या याद्या विमा कंपन्यांना पाठवून प्रत्येक शेतकऱ्याला पीकविमा मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांना सूचना कराव्यात. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांकडून पंचनामे उपलब्ध करून घ्यावेत आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करावा. पेरणीपूर्वी सर्व शेतकरी अर्जदारांना बँकांनी कर्जवाटप करावे. कर्जाचा फॉर्म सर्व बँकांनी सोपा आणि समान ठेवावा. या वर्षी चांगला पाऊस झाला असून, शासनाकडून १२०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे बँकांनी एकही शेतकरी कर्ज मिळवण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही निर्देशही त्यांनी या वेळी दिले.

९४ हजार क्विंटल बियाणाची गरज

खरीप हंगाम २०२१ करिता प्रस्तावित बियाणे बदल दरानुसार जिल्ह्याची एकूण गरज ९४ हजार ७२४ क्विंटलची आहे. सदर बियाण्याचा पुरवठा महाबीज व एन.एस.सी.मार्फत ५६ हजार ७५० क्विंटल तर खासगी बियाणे कंपन्यांमार्फत ३७ हजार ९७४ क्विंटल होणे अपेक्षित आहे. सध्या बाजारात बियाण्याचा पुरवठा नुकताच सुरू झालेला असून, ३०० क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे. गुणवत्तापूर्ण, मुबलक प्रमाणात आणि वेळेवर खते, बियाणे पुरवठा करण्यासाठी तपासणी पथकामार्फत सनियंत्रण करण्यात यावे. कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी २ लाख ९८ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे चालू हंगामात पेरणीसाठी राखून ठेवलेले आहे.

४८ टक्के खतसाठा उपलब्ध

जिल्ह्याचा मागील तीन वर्षांमधील खतांचा सरासरी वापर ५७ हजार २७५ मे. टन असून, खरीप २०२१ करिता ६३ हजार १९० मे. टन खताचे आवंटन मंजूर झालेले आहे. १ एप्रिल २०२१ पर्यंत शिल्लक व आजअखेर झालेली उपलब्धता असे एकूण ३० हजार १४८ मे. टन म्हणजेच ४८ टक्के खतसाठा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या हंगामामध्ये खताची टंचाई भासणार नाही. खरीप हंगामामध्ये गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक कृषी निविष्ठांचा पुरवठा होण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर एकूण २६ गुणनियंत्रक कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुका स्तरावर एक तपासणी पथक नेमण्यात आले आहे.

२० हजार शेतकऱ्यांना मिळाला ‘पोक्रा’चा लाभ

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा योजना) जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत २८७ गावांतील २० हजार ४८८ शेतकऱ्यांना ५८.९५ कोटी अनुदानाचा विविध घटकांतर्गत लाभ देण्यात आलेला आहे.

सोयाबीनसाठी पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. खरीप हंगाम २०२० मध्ये एकूण ६ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर एकूण पेरणी झालेली होती. यामध्ये सर्वाधिक ३ लाख ७४ हजार ६०० हेक्टर म्हणजेच ६० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होता. सोयाबीन या पिकाची सरासरी उत्पादकता ८६० किलो प्रति हेक्टर असून, मागील हंगामात ही उत्पादकता वाढून १६७७ किलो प्रति हेक्टर झाली आहे. या हंगामासाठी एकूण ६ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, यामध्ये ३ लाख ७४ हजार ६०० हेक्टरवर सोयाबीन हे पीक प्रस्तावित केलेले आहे.

Web Title: Do meticulous planning for the kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.