करवसुली तीन टप्प्यात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:28 AM2021-03-14T04:28:16+5:302021-03-14T04:28:16+5:30
कळंब : नगर परिषदेने मार्च एंडच्या नावाखाली शहरवासियांकडून विविध थकीत करांची वसुली जाचक पद्धतीने न करता तीन टप्प्यात करावी, ...
कळंब : नगर परिषदेने मार्च एंडच्या नावाखाली शहरवासियांकडून विविध थकीत करांची वसुली जाचक पद्धतीने न करता तीन टप्प्यात करावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. हळूहळू कमी झालेले हे संकट पुन्हा वाढताना दिसत आहे. यामुळे सर्व व्यावसायिक, छोटे व्यापारी व मजूर अडचणीत आहेत. यातच आता मार्च महिना चालू असल्यामुळे नगरपरिषद कर वसुलीसाठी जोर लावत आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक गणिते बिघडलेली आहेत. सध्या काही प्रमाणात बाजाराची अर्थव्यवस्था ही कमकुवत आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे नगरपरिषदेने कर वसुली जाचक पद्धतीने न करता ही वसुली तीन टप्प्यात करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
या निवेदनावर गटनेते शिवाजी कापसे, नगरसेविका मीरा चोंदे, सुरेखा पारख, अश्विनी शिंदे, नगरसेवक मुश्ताक कुरेशी, अनंत वाघमारे, सतीश टोणगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.