कोणी लस देता का लस...? खासगी रुग्णालयांत दुष्काळ, सरकारीमध्येही रोटेशन पद्धतीने लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:19 AM2021-07-24T04:19:46+5:302021-07-24T04:19:46+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात मार्च महिन्यापर्यंत शासकीय व खाजगी रुग्णालयात लस उपलब्ध होती. मात्र, मे महिन्यापासून केवळ सरकारी रुग्णालयांना लस ...
उस्मानाबाद : जिल्ह्यात मार्च महिन्यापर्यंत शासकीय व खाजगी रुग्णालयात लस उपलब्ध होती. मात्र, मे महिन्यापासून केवळ सरकारी रुग्णालयांना लस मिळत आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून खाजगी रुग्णालयात लसीकरण मोहीम ठप्प आहे. सध्या केवळ सरकारी रुग्णालयात लसीकरण सुरु आहे.
लसीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात होत असल्याने रोटेशन पद्धतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे.
जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. सुरुवातीला लसीचा पुरवठा मुबलक झाला. परंतु , भीतीपोटी नागरिक लस घेण्यास पुढे येत नव्हते. आता विश्वास बसल्याने लोक पुढे येऊ लागले आहेत. परंतु, जिल्ह्यास मागणीच्या तुलनेत लस कमी मिळत आहे. आठवड्यास केवळ १५ हजाराच्या जवळपास डोस मिळत आहेत. लस कमी असल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रावरुन रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
हेच का मोफत लसीकरण
मध्यंतरी लसीचा तुटवडा असल्याने गावातील केंद्रात लसीकरण बंद होते. त्यामुळे लस घेता येत नाही. आताही एकाच केंद्रावर नियमित लसीकरण होत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने लवकर लसीकरण करून घेणार आहे.
महेश पवार
ग्रामीण भागात लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र केंद्र निश्चित राहत नाहीत. गावामध्ये नियमित लस मिळत नाही त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. प्रशासनाने गावात नियमित लस उपलब्ध करून द्यावी.
विशाल राऊत
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात लसीकरण मोहीम सुरू आहे. आठवड्यास जिल्ह्यास १५ हजार डोस मिळत आहेत. त्यामुळे रोटेशन पद्धतीने लस उपलब्ध करून दिली जात आहे. खाजगी रुग्णालयात लसीकरण बंद आहे. लस उत्पादित करणाऱ्या कंपन्यांकडून नोंदणी करून लस घेण्याची मुभा खाजगी रुग्णालयांना देण्यात आली आहे.
डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी
पॉईंटर...
वयोगट पहिला दुसरा एकही नाही
१८-४४ ७१,५३० ४,६७३ ६,६३,०३६
४५-५९ १,०१,९३१ २६,५५४ २,४१,८६३
६० वर्षांपुढील १,१९,०१२ ३९,७९५ ५५,८८५
पहिला डोस ३,३८,२९१
दुसरा डोस ९०,८५६
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. प्रारंभी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली. सुरुवातीला शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयातही लस उपलब्ध करुन देण्यात आली होती.
मे महिन्यापासून खाजगी रुग्णालयांना लस देणे बंद करण्यात आले असून, केवळ शासकीय रुग्णालयात लस दिली जात आहे. मागणीच्या तुलनेत कमी लस मिळत असल्याने रोटेशन पद्धतीने लसीकरण केले जात आहे.