‘रस्ता तुम्हारे बाप का है क्या’; प्रतिसवाल केल्याने तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 01:08 PM2021-07-23T13:08:45+5:302021-07-23T13:10:00+5:30
Murder in Osmanabad : तुम्ही येथे का थांबलात, असे विचारणा करून आरोपींनी शिवीगाळ केली.
कळंब (जि. उस्मानाबाद) : दुकानाजवळ थांबल्याचा जाब विचारल्यावर ‘रस्ता तुम्हारे बाप का है क्या’, असा प्रतिसवाल केल्याने एका कुटुंबातील आठ जणांनी दोन तरुणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली असून, गुरुवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
कळंब शहरातील गांधीनगर भागात बुधवारी रात्री आरेफ ऊर्फ फेरोज ऊर्फ हुसेन आसिफ शेख (२६) व त्याचा मित्र महेबूब महंमद शेख (२६) हे दोघे राहुल धोकटे यांच्या दुकानाजवळ बोलत थांबले होते. तेव्हा तेथे आलेल्या कुणाल धोकटे याने त्यांना तुम्ही येथे का थांबलात, असे विचारणा करून शिवीगाळ केली. तेव्हा महेबूब याने रस्ता तुम्हारे बाप का है क्या, असा प्रतिसवाल केला. यावरून चिडलेल्या धोकटे कुटुंबातील राहुल धोकटे, विजय धोकटे यांनी लोखंडी रॉडने आरेफ व महेबूब यांना मारहाण केली.
आरेफ याला पायावर, तर महेबूब याच्या डोक्यात मार लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी आरेफ व महेबूब यांना उस्मानाबादच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे महेबूब यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर आरेफवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कुणाल धोकटे, राहुल धोकटे, विजय धोकटे, सुनील धोकटे, संदीप धोकटे, विलास धोकटे, मयूर धोकटे, ओमकार धोकटे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.