अतीच झालं! वाद मिटवणाऱ्या पोलिसाच्या अंगावर सोडले कुत्रे; चावा घेतल्याने कर्मचारी जखमी
By चेतनकुमार धनुरे | Published: August 16, 2023 01:10 PM2023-08-16T13:10:44+5:302023-08-16T13:14:03+5:30
याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव : घरगुती वाद पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर ते सामोपचाराने मिटविणे एका पोलिस कर्मचाऱ्याच्याच अंगलट आले आहे. संबंधित घरातील आरोपीने या कर्मचार्याच्या अंगावर पाळीव कुत्रा सोडल्याने त्याने चावा घेऊन जखमी केले. हा प्रकार नळदुर्ग शहरातील रहीमनगर भागात सोमवारी घडला. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नळदुर्ग शहरातील रहीम नगरात राहणाऱ्या एका व्यक्तीने ११२ क्रमांकावर फोन करुन घरगुती वादाबाबत तक्रार केली होती. त्याची दखल घेत हे प्रकरण नळदुर्ग पोलिसांकडे लागलीच वर्ग करण्यात आले. तक्रारीतील माहितीनुसार नळदुर्ग ठाण्यातील पोलिस कर्मचारी नितीन सखाराम राठोड हे आपल्या इतर सहकाऱ्यांसह सोमवारी रहीम नगरात गेले. तक्रारदाराच्या घरी जावून त्यांच्या मुलाची समजूत काढत वाद न करण्याबाबत सांगत होते.
मात्र, आरोपी करण मधुकर लोखंडे याने पोलिसांचे काहीएक न ऐकता उलट त्यांच्याच अंगावर घरात बांधून ठेवलेला पाळीव कुत्रा सोडला. या कुत्र्याने पोलिस कर्मचारी नितीन राठोड यांच्यावर हल्ला करुन पायाला जबर चावा घेतल्याने ते जखमी झाले. शिवाय, आरोपीने हुज्जत घालून असभ्य शिवीगाळ केल्याने त्याच्याविरुद्ध नळदुर्ग ठाण्यात सोमवारीच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.