‘डॉन’ला कोरोनाने पकडलंय, तुम्ही डॉन बनू नका; प्रशासनाच्या बॅनरवर टीकेची झोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 07:47 PM2020-07-18T19:47:11+5:302020-07-18T19:47:30+5:30
अमिताभ बच्चनला झालेल्या आजाराचा वापर त्यांनी चक्क जनजागृतीसाठीच्या बॅनरसाठी करुन स्वत:च नियमांना हरताळ फासला़
लोहारा (जि़उस्मानाबाद) : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा एकीकडे शासन देत असले तरी, लोहारा नगरपंचायतीने मात्र यावर कडीच केली़ अमिताभ बच्चनला झालेल्या आजाराचा वापर त्यांनी चक्क जनजागृतीसाठीच्या बॅनरसाठी करुन स्वत:च नियमांना हरताळ फासला़ दरम्यान, ही चूक लक्षात येताच दुपारी प्रशासनाने लोहाऱ्याच्या मुख्य चौकातील हे बॅनर हटवून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला़
आजूबाजूच्या परिसरात, जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तरीही अद्याप लोहारा शहरात एकही रुग्ण आढळला नाही. अशा स्थितीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यामुळे नागरिकांचा वावर वाढला आहे़ परिणामी, १ जुलै पासुन कारवाईचा बडगा उगारत प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत शेकडो वाहनधारक, नागरिकांकडून हजारो रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. एकिकडे या कारवाया सुरु असतानाच लोहारा नगरपंचायतीकडून जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे़ मात्र, जनजागृतीचा एक प्रकार त्यांच्याच अंगलट आला आहे़ नगरपंचायतीने कोरोनाग्रस्त अभिनेता अमिताभ बच्चन यांचे मोठे छायाचित्र वापरुन त्यांचा डॉन या चित्रपटातील एक प्रसिद्ध डॉयलॉग टाकला आहे़ ‘ज्या डॉनला पकडणे मुश्किलच नाही तर नामुमकीन होते, त्याच डॉनला कोरोनाने पकडलंय़ घरीच थांबा उगाच डॉन बनू नका़’ असे मजकूर बच्चन यांच्या छायाचित्राखाली वापरुन त्याचे एक मोठे बॅनर तयार करण्यात आले़ दरम्यान, या बॅनरची जोरदार चर्चा शहरात रंगली़ यावर टीकेची झोडही उठली़ त्यानंतर चूक उमगलेल्या नगरपंचायतीने चार दिवसांपूर्वी लावलेले हे बॅनर शनिवारी दुपारी अचानक काढून घेतले आहे़ यासंदर्भात नगरपंचायतचे मुख्यधिकारी गजानन शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या बॅनरमध्ये काही फेरबदल करुन परत लावले जाणार असल्याने ते काढून घेतल्याचे सांगितले.