जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात आता दानपेटी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:32 AM2021-02-10T04:32:24+5:302021-02-10T04:32:24+5:30
स्तुत्य-पैसे नव्हे, आवारात प्रवेश करण्यापूर्वी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ दान करावे लागणार उस्मानाबाद : आपण नेहमी एखादे देवस्थान अथवा ...
स्तुत्य-पैसे नव्हे, आवारात प्रवेश करण्यापूर्वी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ दान करावे लागणार
उस्मानाबाद : आपण नेहमी एखादे देवस्थान अथवा सार्वजनिक ठिकाणी दानपेटी पाहताे. परंतु, आता उस्मानाबाद जिल्हा परिषदेने थेट प्रवेशद्वारातच दानपेटी ठेवली आहे. या दानपेटीत पैसे वा साेन्या-चांदीच्या दागिन्यांचे नव्हे, तर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दान करावे लागणार आहे. प्रत्येकाला आपल्याकडील तंबाखूजन्य पदार्थरूपी या दानपेटीत टाकूनच जिल्हा परिषद आवारात प्रवेश करावा लागणार आहे.
गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन मारलेल्या पिचकाऱ्यांमुळे शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे काेपरे रंगल्याचे आपणास पदाेपदी दिसून येते. अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी दंडात्मक कारवाईसाेबतच अन्य उपाययाेजना केल्या आहेत. परंतु, तरीही कार्यालयांचे काेपरे रंगत आहेत. ही बाब समाेर आल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी अनोखी शक्कल लढविली आहे. एखादे सार्वजनिक ठिकाण व देवस्थानाच्या ठिकाणी आपणास नेहमी दानपेेटी दिसून येते. अशाच प्रकारची दानपेटी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात बसविण्यात आली आहे. देवस्थान परिसरातील दानपेटीप्रमाणे यात दागिने वा पैसे टाकणे अपेक्षित नाही, तर पेटीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ दान म्हणून टाकणे अपेक्षित आहे. जे काेणी तंबाखूजन्य (लाेकप्रतिनधी, अधिकारी, कर्मचारी) पदार्थांचे सेवन करतात, त्यांनी आपल्याकडील हे पदार्थ पेटीमध्ये दान म्हणून टाकूनच आवारात प्रवेश करणे अपेक्षित आहे. यानंतरही जे काेणी तंबाखूजन्य पदार्थ खाऊन काेपरे रंगवतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सीईओंनी लढविलेली ही शक्कल कितपत यशस्वी ठरते? हे येत्या काही दिवसांत दिसून येईल.
चाैकट..
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांच्या हस्ते दानपेटीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संजय तुबाकले, अनंत कुंभार, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबाेळी, कार्यकारी अभियंता जाेशी, नितीन भाेसले, कृषी विकास अधिकारी डाॅ. टी. जे. चिमनशेट्टे, अभियंता ओ. के. सय्यद आदींची उपस्थिती हाेती.