ठिबकमुळे एकरी ३० ते ४० टक्के उत्पन्न वाढ शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:37 AM2021-09-12T04:37:42+5:302021-09-12T04:37:42+5:30
उस्मानाबाद : पाण्याचा अपव्यय टाळून आणि ठिबक सिंचनाचा वापर करून शेती करणारा प्रत्येक शेतकरी लखपती बनू शकतो. ठिबक लावल्याने ...
उस्मानाबाद : पाण्याचा अपव्यय टाळून आणि ठिबक सिंचनाचा वापर करून शेती करणारा प्रत्येक शेतकरी लखपती बनू शकतो. ठिबक लावल्याने प्रति एकर ३० ते ४० टक्के उत्पन्नात वाढ होणे शक्य आहे, असे प्रतिपादन रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी येथे केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी आयोजित जलसंधारण आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश बिराजदार, राज्य प्रशिक्षण समन्वयक नीलेश घुगे, राज्य प्रकल्प अधिकारी सायली घाणे आणि जिल्हा परिषद व महसूल विभागातील विभागप्रमुख उपस्थित होते.
पाण्याच्या प्रत्येक थेंबातून आणि मातीच्या प्रत्येक कणातून उत्पन्न वाढवणे शक्य आहे. त्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांची मानसिकता तयार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी समृद्ध व्हावे, ही आपली प्रथम प्राथमिकता असली तरच समृद्ध शेतकरी हा समृद्ध महाराष्ट्राचा पाया रचेल. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याच्या उद्धारासाठी शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देश नंदकुमार यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ६२२ ग्रामपंचायतींतील माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात एकूण मजुरांची संख्या ६ लाख ५२ हजार असून, त्यापैकी २ लाख ९१ हजार मजुरांना जॉबकार्ड देण्यात आले आहे, तसेच ५९ हजार मजूर कामांवर आहेत. जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत ५४ हजार ८८२ योजनेच्या सुरुवातीपासून आहेत. ३९ हजार ५६० कामे पूर्ण झाली असून, १५ हजार ३२२ कामे अपूर्ण आहेत. पूर्ण कामांची टक्केवारी ७२.८ टक्के असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन चंदनशिवे यांनी केले, तर आभार जिल्हा परिषदेचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक विलास खिल्लारे यांनी मानले.
चौकट......
जोडधंद्याबाबत प्रबोधन व्हावे
शेतीतील उत्पन्नात वाढ करण्यासाठी पाण्याचे अपव्यय टाळणे ही काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर शेतीसोबत इतर जोडधंद्यांबाबतही शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे अपेक्षित आहे, असेही नंदकुमार यावेळी म्हणाले. उस्मानाबाद जिल्ह्याचा झपाट्याने विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
रोजगार हमीबाबत जनजागृती करा
रोजगार हमी योजनेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. मोठ्या संख्येने जॉबकार्ड उपलब्ध करून द्यावे, तसेच प्रत्येक गावामागे पाच कामे सेल्फवर ठेवा. म्हणजे मागेल त्याला काम या संकल्पनेचा अवलंब करणे अधिकाधिक सोपे होईल. सेल्फच्या माध्यमातून पाच कामांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता असलेल्या कामांमुळे काम मागणाऱ्याला लवकर काम सुरू करण्यास मदत मिळते. जलसंधारण विभागाने पूर्ण क्षमतेने काम केल्यास जिल्ह्यात पडणाऱ्या सरासरी ७० सें.मी. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न सुटतील, असेही नंदकुमार यावेळी म्हणाले.