शिंदेंच्या मंत्रिमंडळात दुष्काळी उस्मानाबादला दोन पदांची आस; एक नाव तर फिक्सच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 03:57 PM2022-07-02T15:57:46+5:302022-07-02T15:59:52+5:30
दुष्काळी जिल्ह्यात मंत्रिपदांची लॉटरी लागण्याची चिन्हे
- चेतन धनुरे
उस्मानाबाद : नैसर्गिक अन् राजकीयदृष्ट्याही दुष्काळी गणल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याची नव्या सरकारात लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील सेनेचे दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे यातील एकाचे तर मंत्रिपद जवळपास फिक्स आहेच. आता दुसरे मंत्रिपद हे दुसऱ्या आमदाराच्या पदरी पडणार की भाजप आमदाराची लॉटरी लागणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचा अपवाद वगळता आजवर जिल्ह्याला एकही महत्त्वाचे खाते असलेले मंत्रिपद मिळाले नाही. मागच्या टर्मला चारपैकी तीन आमदार हे विरोधी पक्षातील होते. एकमेव आमदार ज्ञानराज चौगुले हे सत्ता पक्षातील राहिले. मात्र, त्यांनाही संधी मिळाली नाही. यावेळच्या निवडणुकीत तीन आमदार शिवसेनेचे, तर एक भाजपचा निवडून आला. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत जिल्ह्याला एक तरी मंत्रिपद मिळेल, अशी आशा होती, ती फोल ठरली. यामुळे दुखावले गेलेले सेनेचे आमदार तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात त्यांची साथ दिली.
यातही तानाजी सावंत हे आघाडीवर होते. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे आमदार चौगुले हेही एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातील ताईत आहेत. सलग तीन वेळा निवडून आलेले चौगुले हे उद्धव ठाकरे यांचा शब्द ओलांडून शिंदे यांच्या प्रेमापोटी बंडात सहभागी होतात यातच सर्वकाही आले. त्यामुळे त्यांचेही पारडे जड आहे. मात्र, ऐनवेळी दोघांपैकी एकाला संधी देण्याचे ठरल्यास चौगुले यांच्याकडे महामंडळ वा तत्सम जबाबदारी या टर्ममध्ये सोपविली जाण्याची शक्यता अधिक आहे.
भाजपच्या आशेला पालवी...
मागच्या टर्मपर्यंत जिल्ह्यात भाजपचा एकही विधानसभा आमदार नव्हता. ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांना पक्षात आणून त्यांना तुळजापूरहून निवडणूक लढविण्यास प्रेरित केले. येथील काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकरराव चव्हाण यांना पराभूत करीत पाटील यांनी विजय मिळविला. भाजपला जिल्ह्यात संघटनेचा विस्तार करायचा आहे. त्यामुळे येथे मंत्रिपद देणे अत्यावश्यक ठरते. यातूनच राणाजगजितसिंह पाटील यांचे पारडे जड ठरते आहे. परिणामी, जिल्ह्यात किमान दोन मंत्रिपदे येण्याची दाट शक्यता आहे.