मुख्याधिकाऱ्यांअभावी पालिकेच्या कामकाजाची घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:47+5:302021-07-15T04:22:47+5:30

उमरगा : येथील मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे मागील सात-आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासन अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला ...

Due to the absence of the chief officer, the working hours of the municipality were disrupted | मुख्याधिकाऱ्यांअभावी पालिकेच्या कामकाजाची घडी विस्कटली

मुख्याधिकाऱ्यांअभावी पालिकेच्या कामकाजाची घडी विस्कटली

googlenewsNext

उमरगा : येथील मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे मागील सात-आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासन अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. यामुळे ते सध्या उस्मानाबादेत मुक्कामी असून, आठवड्यातील एखादा दिवस येथे हजेरी लावतात. त्यामुळे पालिकेतील कामकाजाची घडी विस्कटली असून, अनेक कामे खोळंबून राहत असल्याचे दिसत आहे.

मुबलक पाणी असतानाही सध्या शहरात पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दररोज एखाद्या वाॅर्डातील नागरिक, महिला पालिकेत धरणे देतात वा घेराव घालत असताना यावर कसलाच तोडगा निघत नाही. स्वच्छता, घरकुल, तसेच विविध योजनांची अंमलबजावणी, बांधकाम परवाने, विकासकामे याकडेदेखील पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. साथीच्या आजाराने कहर केला आहे. घरकुल योजनेची अंमलबजावणी, बांधकाम परवानगी, विकासकामे व त्यांचे नियोजन, विविध कामांची देयके, करवसुली, विविध योजनेंतर्गत येणाऱ्या विकास निधींचा वापर करण्याबाबतच्या सूचना, परवानग्या ही कामे मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीविना खोळंबून राहत आहेत. उमरगा हे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक आहे. एवढ्या महत्त्वाच्या पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना आठ-नऊ महिने इतरत्र प्रभारी नियुक्ती का दिली जाते, असा प्रश्न आता शहरवासीयांतून उपस्थित होत आहे.

कोट.........

मुबलक पाणीसाठा असतानाही गळतीमुळे शहराला पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गेल्या वर्षभरात मुख्याधिकाऱ्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, तसेच नवीन नियोजित पाणीपुरवठा योजनेला कार्यान्वित करण्यासाठीही फारशी उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळेच शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र बनत आहे. आमच्या प्रभाग-९ मध्ये पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होतो आहे. मुख्याधिकारीच नसल्याने समस्या मांडायच्या कुणासमोर, असा प्रश्न आहे.

-दत्तू रोंगे, सामाजिक कार्यकर्ते

कोट.........

उमरगा पालिकेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी असूनही ते कायम गैरहजर असतात. आठवड्यातून एखादा दिवसच हजर राहत असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाला त्यांना येथे कामच करू द्यायचे नव्हते, तर येथे नियुक्ती दिली कशासाठी, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. येथे नवीन मुख्याधिकारी नियुक्त करून नागरिकांची अडचण दूर करावी, अशी आमची मागणी आहे.

-संजय पवार, गटनेते, राष्ट्रवादी

Web Title: Due to the absence of the chief officer, the working hours of the municipality were disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.