भूकंप अन् दुष्काळामुळे झाला होता प्राचीन तगर शहराचा नाश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 07:08 PM2018-09-06T19:08:59+5:302018-09-06T19:12:43+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यातील सध्याचे तेर हे गाव प्राचीन काळी म्हणजेच सातवाहन काळात तगर या नावाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून ओळखले जायचे.
- सुमेध वाघमारे
तेर ( उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्ह्यातील सध्याचे तेर हे गाव प्राचीन काळी म्हणजेच सातवाहन काळात तगर या नावाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून ओळखले जायचे. भूकंप आणि दुष्काळामुळे या शहराचा नाश झाल्याचा निष्कर्ष पुरातत्व विभागाने काढला आहे़ त्यामुळे तेरच्या समृद्ध इतिहासाला उजाळा मिळाला आहे.
साधारणत: १९७६ मध्ये पहिल्यांदा तेरचा इतिहास अभ्यासला गेला़ त्यातून ही नगरी सातवाहन काळातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यानंतर २०१५ मध्ये पुरातत्व विभागाच्या उपसंचालक डॉ. माया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेर येथील सर्वात उंच कोट टेकडी, बैरागी टेकडी व कैकाडी टेकडी येथे जवळपास दोन महिने उत्खनन केले. या उत्खननादरम्यान सातवाहन काळातील घराचे अवशेष, तांब्याची नाणी, शंखापासून तयार केलेले वेगवेगळे दागिने, अलंकार मणी, हस्ती दंताची फणी, तांदूळ, गहू, मूग दाळ, तूर दाळ, खापरी भांडे अशा अनेक वस्तू आढळून आल्या होत्या. पुरातत्व विभागाचे १२ अधिकारी दोन महिने येथे तळ ठोकून होते. उत्खननानंतर सदरील वस्तू अभ्यासासाठी मुंबई येथे नेण्यात आल्या. या वस्तूंवर जवळपास तीन वर्षे अभ्यास केल्यानंतर काही निष्कर्षापर्यंत अभ्यासक पोहोचले आहेत़ हे निष्कर्ष नागरिकांचे कुतुहल वाढविणारे ठरत आहेत़
चांगल्या पाऊसपाण्याचा परिसर बनला दुष्काळी
दोन हजार वर्षांपूर्वी तेरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडायचा. त्यामुळे येथील घरे कौलारू स्वरूपाची होती. सुरूवातीला दगड मातीचा पाया व नंतर ३६ बाय १७ बाय ५ लांबीच्या भाजलेल्या विटा बांधकामासाठी वापरल्या जात असत. गाय, बैल, शेळ्या यासारखे पाळीव प्राणीही अस्तित्वात होते. पाऊस चांगला होत असल्याने येथे भाताची लागवड केली जायची़ गव्हाचे पीकही घेतले जायचे. कालांतराने पाऊसमान कमी झाले़ भूकंपाप्रमाणेच तेरच्या लुप्ततेमागे दुष्काळाचेही कारण होते.
सुती काप व्हायचे निर्यात
सातवाहन काळात तेरमध्ये (तत्कालीन तगर) हस्ती दंतावर कलाकुसर करून वेगवेगळ्या वस्तू तयार करणारे कामगार होते. येथे वस्तू तयार करून ते परदेशात व्यापार करीत असत. हे काम करणाऱ्यांची या ठिकाणी मोठी वसाहतच होती. या ठिकाणी सुती कपडा तयार करणारी वसाहत होती. हा कपडा विदेशात निर्यात केला जात होता.
खीर, भात, खिचडीचा आहार
सातवाहन काळात तांदूळ, गहू, मूगदाळ, तूरदाळ, बाजरी आदी धान्य उपलब्ध होत. परंतु, त्या काळात धान्य दळण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे तांदळापासून भात, खिचडी तयार केले जात असे. गहू रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खीर तयार करण्यात येत असे.
सांचीच्या स्तुपासाठी तेरमधून मदत
या काळात बौद्ध धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. बौद्ध धर्माच्या त्रिरत्नासारखी धार्मिक चिन्हे असलेले मणी या उत्खननात सापडले होते. सातवाहन राजा हा बौद्ध धर्माचा उपासक होता. त्यामुळे अनेक प्रकारच्या बौद्ध स्तुपांची निर्मिती या ठिकाणी केली गेली. याच काळात सांची येथील स्तूपाच्या बांधकामासाठी तेर येथून सातवाहन राजांनी मदत केली होती.
अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत
तेर येथे सन २०१५ मध्ये केलेल्या उत्खननात सापडलेल्या वस्तुंचा अभ्यास केल्यानंतर अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. हा अहवाल राज्यशासनाच्या पुरातत्व विभागाकडे सादर केला आहे.
- डॉ. माया पाटील, माजी उपसंचालिका, पुरातत्व विभाग व सोलापूर विद्यापीठाच्या प्रमुख