फटाका कारखान्याच्या भीषण स्फोटात मालकाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 02:18 PM2019-05-20T14:18:56+5:302019-05-20T14:19:37+5:30
एक कामगार महिला गंभीर जखमी
कळंब (जि. उस्मानाबाद) : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात कारखाना मालकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर भाजली आहे. तिला पुढील उपचारार्थ अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कळंब शहरापासून अर्धा किमी अंतरावर लातूर कळंब-भाटसांगवी राज्यमार्गावर फेरोज फायर वर्क्स हा फटक्याचा कारखाना आहे. कळंब महसूल हद्दीतील अय्युब युनूस आत्तार यांच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक १३८ मधील एक हेक्टर क्षेत्रामध्ये हा कारखाना उभारण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून रितसर परवाना घेवून चालवण्यात येणाऱ्या या फटका कारखान्यात विविध फटाक्यांची निर्मिती केली जात होती. यासाठी सदर क्षेत्रात पाच पक्के बांधकाम केलेल्या खोल्या व काही पत्र्याचे शेड होते.
यामध्ये रविवारी मालक व काही महिला कामगार फटाका बनवण्याचे काम करत होत्या. याच दरम्यान दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका खोलीमध्ये अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत फटाका कारखान्याचे मालक फेरोज अय्युब आत्तार (३८ रा. जिजाऊ नगर, कळंब) यांचा जागीच मृत्यू झाला. तर याठिकाणी कार्यरत असलेल्या सलमा रज्जाक शेख (३५ रा. इंदिरानगर) या गंभीररीत्या भाजल्या आहेत. त्यांना कळंब येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. नंतर पुढील उपचारार्थ अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले.
आणि ते बचावले...
कारखान्यात वीस पेक्षा जास्त कामगार कामाला असल्याचे समजते. परंतु, रविवारी यातील अनेक कामगार उष्णता व लग्नसराई यामुळे कामावर हजर नव्हते. त्यामुळे ते बचावले. तसेच घटनेपासून काही अंतरावर काही महिला काम करत होत्या. स्फोटानंतर त्यांनी पळ काढला.
आपत्कालीन यंत्रणा धावलीच नाही...
घटनास्थळी सर्वात प्रथम कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनोज चोंदे हे पोहोचले. त्यांनी अग्निशामक यंत्रणा, ग्रामीण रूग्णालय व १०८ आरोग्य सेवेला संपर्क केला. परंतु, नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडीच नसल्याचे समोर आले; तर ग्रामीण रूग्णालयाची ना यंत्रणा आली ना रुग्णवाहिका. अशीच अवस्था आपतकालीन आरोग्य सेवेच्या १०८ रुग्णवाहिकेची झाली. यामुळे जखमीला उशिरा मदत मिळाली.
घटनास्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी...
कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, तहसीलदार मंजूषा लटपटे, नायब तहसीलदार अस्लम जमादार, तलाठी एस. एस. बिक्कड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कळंब पोलीस दुर्घटनेची कसून चौकशी व पाहणी करत होते.