प्रवाशांअभावी स्थानकातूनच बसेस फिरतात आगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:24 AM2021-06-06T04:24:27+5:302021-06-06T04:24:27+5:30
उस्मानाबाद : मागील दोन महिन्यांपासून एसटीची बससेवा ठप्प आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवासी वाहतुकीस एसटीला मुभा देण्यात आली आहे. मात्र, ...
उस्मानाबाद : मागील दोन महिन्यांपासून एसटीची बससेवा ठप्प आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवासी वाहतुकीस एसटीला मुभा देण्यात आली आहे. मात्र, प्रवासी मिळत नसल्यामुळे बसेस स्थानकातूनच माघारी आगारात फिरत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गास आळा बसावा, यासाठी शासनाने एप्रिल महिन्यापासून राज्यात कडक निर्बंध लागू केले होते. या काळात राज्य परिवहन महामंडळाची बससेवाही बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता अत्यावश्यक सेवेतील प्रवासी वाहतुकीस एसटीला मुभा देण्यात आली आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयांत कर्मचारी, फळ विक्रेते, दूध विक्रते, भाजी विक्रेत्यांना या बसमधून प्रवास करण्यास परवागी आहे. जिल्ह्यातील सहा आगारातही सकाळपासून काही मार्गांवर बसेस सोडण्यात येत असतात. मात्र, बसला ५० टक्के प्रवासी म्हणजे २२ प्रवासी मिळत नसल्यामुळे स्थानकातूनच आगारात माघारी फिरावे लागत आहे. प्रवासासाठी आलेले प्रवासी खबरदारी म्हणून नाका-तोंडास मास्क लावून तसेच सॅनिटायझर जवळ बाळगत आहेत. परंतु, बसेस धावत नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.
जिल्ह्यातील एकूण बसेस ४५०
सध्या सुरू असलेल्या बसेस ००
एकूण कर्मचारी २४००
सध्या कामावर वाहक १००
सध्या कामावर चालक १५०
वाहक ९५०
चालक १०५०
मास्क, सॅनिटायझरचा वापर
बसस्थानकात तुरळक प्रवासी सोलापूर, लातूर, कळंब या मार्गांवर प्रवास करण्यासाठी येत असतात. बसस्थानकात आलेल्या प्रवाशांच्या नाका-तोंडास मास्क लावलेले आढळून येते. तसेच जवळ सॅनिटायझर पाहावयास मिळते. मात्र, बसला ५० टक्के प्रवासी नसल्याने प्रवासी माघारी फिरतात.
३० कोटीचा फटका
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून बसेस बंदच आहेत. प्रतिदिन एसटीला वाहतुकीतून ५० लाखांचे उत्पन्न मिळत असते. गाड्या बंद असल्याने दोन महिन्यांत ३० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
प्रवासी घरातच
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक मानली जात आहे. त्यामुळे अनेक प्रवासी प्रवास करण्याचे टाळून घरात बसण्यास प्राधान्य देत आहेत.
एसटीची कोणत्याच मार्गावर वाहतूक नाही
अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ५० टक्के प्रवासी क्षमतेनुसार प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे.
लातूर, सोलापूर, कळंब या मार्गांवर प्रवासी संख्या अधिक असते. म्हणून या मार्गांवर जाण्यासाठी उस्मानाबाद स्थानकातील फलाटावर बसेस उभ्या केल्या जातात. प्रवासी मिळत नसल्याने स्थानकातूनच बसेस आगारात माघारी फिरत आहेत.
बसेस सुरळीत सुरू होण्याची प्रतीक्षा
मागील दोन महिन्यांपासून बसेस बंद आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी बसेस सुरू आहेत. १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहत आहे. सुरळीत बससेवा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
चालक,
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बससेवा बंद आहे. अत्यावश्यक सेवेसाठी बसेस फलाटवर उभ्या केल्या जातात. मात्र, प्रवासी मिळत नसल्याने बस पुन्हा आगारात उभी करावी लागत आहे.
वाहक