भाव नसल्याने वांगे जनावरांच्या दावणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:29 AM2021-03-22T04:29:07+5:302021-03-22T04:29:07+5:30
बाजार दर घसरल्याने शेतकरी हवालदिल तामलवाडी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाजारात फळभाज्यांचे दर घसरल्याने वांग्याला प्रति किलो २ रुपये ...
बाजार दर घसरल्याने शेतकरी हवालदिल
तामलवाडी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाजारात फळभाज्यांचे दर घसरल्याने वांग्याला प्रति किलो २ रुपये भाव मिळत आहे. हा भाव परवडत नसल्यामुळे तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील शेतकरी रवींद्र सुधाकर शिंदे यानी उत्पादित केलेली वांगी जनावरांना खाऊ घालत नाराजी व्यक्त केली.
खडकी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेवटच्या टोकाचे गाव आहे. येथून १२ किमी अंतरावर सोलापूर शहरातील बाजारपेठ आहे. ताजा तोडणी केलेला भाजीपाला बाजारात विक्रीसाठी नेला जातो. त्या धर्तीवर खडकी गावातील रवींद्र सुधाकर शिंदे यानी ३० गुंठे जमिनीवर पॉलिथिन पेपरचा आधार घेत ठिबक सिंचनावर वांगे रोपाची लागवड केली. कीटकनाशक फवारणी लागवड याकरिता ३५ हजार रुपये खर्च केला. आता कुठे फळधारणा होऊन वांगे बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना, सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाजारात वांग्याचे दर कमालीचे घसरले आहेत. २० किलो वजनाच्या कॅरेटला ३० रुपये ते ६० रुपये मिळत असल्याने दिवसभर तोडणी केलेल्या मजूर महिलेची मजुरीही पदरात पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे अखेर शेतकरी रवींद्र शिंदे यांनी शेतात उत्पादित केलेली वांगी बाजारात विक्रीला घेऊन जाण्यापेक्षा शेतात पाळलेल्या जनावरांना खाऊ घालत दावणीला टाकले आहे.
फुकट वांगे खावा
बाजारात भाव मिळत नाही, हे ओळखून रवींद्र शिंदे यानी ३० गुंठे शेतातील वांगी गावकऱ्यांना फुकट खाण्यासाठी खुली केली आहेत. गावातील गरजू कुटुंबे ही वांगी घेऊन जात आहेत. यामुळे शेतकऱ्याने वांगी जोपासण्यासाठी आजवर केलेली सर्व मेहनत अक्षरश: वाया गेली आहे.