पावसाअभावी १९ हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:37 AM2021-08-14T04:37:45+5:302021-08-14T04:37:45+5:30
काटी कृषी मंडळात माळरान व काळरान जमिनीचा दोन प्रकारांत समावेश आहे. मृग नक्षत्रात पडलेल्या पावसावर बळिराजाने खरिपाची पेरणी उरकली. ...
काटी कृषी मंडळात माळरान व काळरान जमिनीचा दोन प्रकारांत समावेश आहे. मृग नक्षत्रात पडलेल्या पावसावर बळिराजाने खरिपाची पेरणी उरकली. पीक उगवणीनंतर पावसाने १५ दिवसांचा अवधी घेतला. नंतर पुनर्वसू नक्षत्रात दिलासा मिळाला. त्यात पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे साेयाबीन पदरात पडेल, अशी अपेक्षा बळिराजाला लागली हाेती. परंतु, मागील २५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे सुमारे १९ हजार हेक्टरवरील साेयाबीन, ७ हजार हेक्टवरील उडीद, मूग जागेवरच करपून चालले आहे. परिणामी शेतकरी चिंतेत आहेत.
चौकट -
यंदा चार एकर क्षेत्रात ४० हजार रुपये खर्च करून सोयाबीनची पेरणी केली. पाऊस नसल्याने विहिरीचा पाणीसाठा वाढला नाही. विहिरीत पाणी नसल्याने विद्युतपंप तासभरच चालताे. त्यामुळे डाेळ्यांदेखत उभे पीक वाया चालले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत.
- गोविंद माळी, सावरगांव.
चौकट -
गतवर्षी अतिवृष्टीने सोयाबीन भिजून वाया गेले. त्या नुकसानीचा विमा अद्याप मिळाला नाही. असे असतानाच यंदा पुन्हा पावसाने धोका दिल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभारले आहे. पिकांचे नुकसान झालेले असताना ते विमा कंपनीस दिसत नाही. विमा कंपनी प्रतिनिधींनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करावी.
-ॲड. गजानन चौगुले, पिपंळा (बु.)