रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळलेल्या विद्यार्थिनींचा पोलीस स्थानकावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 05:58 PM2018-12-26T17:58:36+5:302018-12-26T17:59:02+5:30
विद्यार्थिनींना शाळेत जाताना मागील काही महिन्यांपासून रोडरोमिओंच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
येणेगूर (उस्मानाबाद) : रोडरोमिओंच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी बुधवारी सकाळी आठ वाजता येथील पोलीस दूरक्षेत्र व ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.
उमरगा येथील दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत जाताना मागील काही महिन्यांपासून रोडरोमिओंच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. असे असतानाच काही दिवसांपासून तर संबंधित तरूण दुचाकीवरून विद्यार्थिनींना कट मारून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. रोडरोमिओंच्या या सततच्या त्रासाला वैतागलेल्या विद्यार्थिनींनी बुधवारी सकाळी येणेगूर पोलीस दूरक्षेत्रावर मोर्चा काढला. रोडरोमिओंचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. यानंतर पोहेकॉ. निवृत्ती बोळके व पोना दिगंबर सूर्यवंशी यांना स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी गोपनियरित्या चिठ्ठ्या टाकून त्रास देणाऱ्या टवाळखोरांची नावे देण्याबाबत पोलिसांनी विद्यार्थिनींना सांगितले असता, या माध्यमातून चार ते पाच टवाळखोरांची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत. संबंधित टवाळखोरांवर त्वरित करावाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.
यानंतर विद्यार्थिनींनी आपला मोर्चा ग्रामपंचायतीकडे वळविला. या ठिकाणी उपसरपंच वैभव बिराजदार, बसवेश्वर माळी, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुधाकर धामशेट्टी, सदस्य अमोल स्वामी, सतीश मुदकण्णा यांनी विद्यार्थिनींचे निवेदन स्विकारले. थोडाही विलंब न करता, ग्रामपंचायतीने पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पत्र देऊन टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे विद्यार्थिनींसह पालकांचेही लक्ष लागले आहे.