लसीच्या तुटवड्याने कासवगती, प्रत्येकाला दाेन्ही डाेस मिळण्यासाठी लागू शकतात सहा वर्ष...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:21+5:302021-07-28T04:34:21+5:30
उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नाही. उलट काहीअंशी वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत लाेक लसीकरणासाठी पुढे येऊ लागले आहेत. ...
उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नाही. उलट काहीअंशी वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत लाेक लसीकरणासाठी पुढे येऊ लागले आहेत. एका आठवड्यात १ लाख डाेस देता येतील, एवढे तगडे नियाेजन आराेग्य यंत्रणेने केले आहे. परंतु, आठवडाभरात अत्यल्प डाेस उपलब्ध हाेत आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात लसीकरण कासवगतीने सुरू आहे. १२ लाख ५९ हजार २५७ पैकी ३ लाख ४२ हजार ९९३ व्यक्तींनाच पहिला डाेस दिला आहे. तर, दुसरा डाेस अवघ्या १ लाख २ हजार १२० जणांना मिळू शकला. याचे प्रमाण ८.११ टक्के इतके आहे. लसीकरणाची हीच गती कायम राहिल्यास सर्व व्यक्तींना दाेन्ही डाेस मिळविण्यासाठी किमान सहा वर्ष लागू शकतात.
अद्याप पहिलाच डाेस मिळेना...
मागील काही दिवसांत जिल्ह्यात रूग्ण संख्या वाढत आहे. माझ्याकडे माेबाईलची सुविधा नाही. त्यामुळे आराेग्य केंद्रात कॅॅम्प वेळी दाेनदा जाऊन आलाे. परंतु, पुरेसे डाेस उपलब्ध नसल्याने मला लस मिळू शकली नाही.
-संदीप सुतार, लस लाभार्थी.
आमच्या गावात एकवेळा लसीकरणाचा कॅम्प झाला. परंतु, पहाटेपासूनच ग्रामस्थांनी गर्दी केली हाेती. त्यातही ज्येष्ठ अधिक हाेते. मात्र, डाेस त्या प्रमाणात उपलब्ध नव्हते. त्यामुळे मला लसीचा पहिला डाेस मिळू शकला नाही.
-पंडित कदम, लस लाभार्थी.
लसीकरण का वाढेना?
जिल्ह्यात लसीकरणाचे लाभार्थी सुमारे १२ लाख ५९ हजार २५७ एवढे आहेत. आजवर केवळ ३ लाख ४२ हजार ९९३ लाेकांनाच पहिला डाेस देण्यात आला आहे. आणखी ९ लाख १६ हजार लाेक लसीविना आहेत. आराेग्य यंत्रणेने आठवडाभरात १ लाख लाेकांचे लसीकरण करण्याची क्षमता निर्माण केली आहे. परंतु, जिल्ह्याला एकेका वेळी चार ते साडेचार हजार डाेस उपलब्ध हाेतात. त्यामुळे लसीकरणाला गती येत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे शासनाने आता डाेसची संख्या वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
२४१ केंद्रामध्ये सुरू आहे लसीकरण
काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन आराेग्य यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हाभरात २४१ शासकीय लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली. आजघडीला ही सर्वच केंद्र सुरू आहेत. परंतु, पुरेशा प्रमाणात डाेस उपलब्ध हाेत नसल्याने लसीकरण कासवगतीने सुरू आहे. खाजगी १९ केंद्र मंजूर आहेत. परंतु, लस नसल्याने ती बंद आहेत. उपराेक्त प्रश्न लक्षात घेता, लस तातडीने उपलब्ध हाेणे गरजेचे आहे.