कोरोना काळात ताई अन्‌ कार्यकर्ती ठरताहेत खऱ्या अर्थाने फ्रंट वर्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:34 AM2021-04-28T04:34:47+5:302021-04-28T04:34:47+5:30

कळंब : गावागावात, गल्लोगल्ली कोरोना बाधितांची संख्या वृद्धिंगत होत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. लॉकडाऊन, संचारबंदी यासह विविध निर्बंध ...

During the Corona period, Tai An became a front worker in the true sense of the word | कोरोना काळात ताई अन्‌ कार्यकर्ती ठरताहेत खऱ्या अर्थाने फ्रंट वर्कर

कोरोना काळात ताई अन्‌ कार्यकर्ती ठरताहेत खऱ्या अर्थाने फ्रंट वर्कर

googlenewsNext

कळंब : गावागावात, गल्लोगल्ली कोरोना बाधितांची संख्या वृद्धिंगत होत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. लॉकडाऊन, संचारबंदी यासह विविध निर्बंध लादले गेले आहेत. यामुळे लोकजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना व्हायरसने दळणवळण ‘ठप्प’ केले आहे, एकमेकांचा सहवास निषिद्ध केला आहे. असे असले तरी या कोरोना महामारीच्या संकटकाळात तुटपुंजे ‘मानधन’ असलेल्या अंगणवाडी कर्मचारी व नाममात्र ‘मोबदला’ घेणाऱ्या आशा कार्यकर्ती मात्र जीवाची बाजी लावत काम करीत असल्याने त्या खऱ्या अर्थाने ‘फ्रंट वर्कर’ ठरल्या आहेत.

तालुकास्तरीय अधिकारी कोरोनाचा प्रकोप कमी व्हावा, साखळी तुटावी यासह आरोग्य व्यवस्थांची क्षमता वृद्धी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आरोग्य विभाग बाधितांचा ‘श्वास’ बळकट करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा व क्षमतेचा पुरेपूर वापर करत आहेत. याशिवाय सोशल डिस्टन्स, ट्रेसिंग, स्क्रिनिंग, टेस्टिंग यावर भर दिला जात आहे. यासह ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ आणि ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यासारखे उपक्रम राबवत थेट कुटुंबांशी ‘कनेक्ट’ होत आलेल्या संकटाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकूणच कोरोना महामारीने सर्वांना हलवले आहे, हवालदील केले आहे. परंतु, या सर्वांत काही प्रशासकीय घटक मात्र मोठ्या गांभिर्याने, आत्मियतेने या संकटात आपले योगदान देत आहेत. यात प्रामुख्याने समावेश होतो तो अंगणवाडी ताई, मदतनीस, आशा ताई, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा.

अतिशय तोकड्या मानधनात ही मंडळी कार्यरत आहे. यात ही अंगणवाडी ताई, मदतनीस व आशा हा कर्मचारी वर्ग तर थेट लोकांच्या दारात जाऊन, मोठी जोखीम पत्करून काम करत आहे. पगार ‘गलेलठ्ठ’ नसली तरी त्यांचे कोरोना काळातील योगदान खरोखरच आजन्म न विसरण्यासारखे असल्याची ‘शाब्बासकी’ अनेक गावातील ग्रामस्थांच्या मुखी येत आहे

चौकट...

सहाशे ‘ताई’ युद्धभूमीवर...

सध्या कोविड व्हायरसशी एकप्रकारे युद्धच सुरू आहे. यात गावोगावच्या आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर ‘पर्यवेक्षक’ म्हणून नियुक्ती करत काही कुटुंबाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तालुक्यात २१९ अंगणवाडी ३० मिनी अंगणवाडी आहेत. यातील ४३६ अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य विभागाच्या १६६ आशा कार्यकर्ती अशा एकूण ६०३ ‘ताई’ आजच्या स्थितीत कोरोना लढ्यात प्रत्यक्ष युद्धभूमीवर आपली काम चोख बजावत कमान सांभाळत आहेत.

बाबा, तात्या... घरात सगळी खुशाल आहेत का?

अंगणवाडी ताई, मदतनीस, आशाताई या शिक्षकांसारखेच आपल्याला नेमून दिलेल्या कुटुंबाच्या दारात दाखल होत घरातील व्यक्तींना नावाने हाक मारत ‘खुशाली’ विचारत आहेत. ऑक्सिजन व ताप तपासणी करत आहेत. संशयित आहेत का?, कोणाला अन्य आजाराचा त्रास आहे का? कोणी बाहेरून आले आहे का? याची नोंद ठेवत आहेत. याची माहिती संबंधितांना दररोज देत आहेत. एकूणच ताईंचे हे काम वाखाणण्या जोगे असेच आहे.

मानधन तोकडे, पण काम लाख मोलाचे

अंगणवाडी सेविका यांना साठेआड हजार तर मदतनीस यांना पाच हजार ‘मानधन’ मिळते. आरोग्य विभागाच्या आशाताईंना तर मानधन ही नाही अन् वेतन ही नाही. त्यांना लसीकरण, गरोदर माता तपासणी अशा कामावर ‘मोबदला’ देण्यात येतो. मोठ्या गावात तो चारीक हजारावर तर छोट्या गावात दोन-अडीच हजारावर तो अडकतो. एकूणच तुटपुंज्या व नाममात्र मानधनावर गृहभेटी करत कोरोना लढ्यात सहभागी झालेल्या या ताई खऱ्या अर्थाने फ्रंट वर्कर असून त्यांच्या कामाचे सरकार दरबारी मोल व्हावे अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ऑप्शनल चौकट

वर्षभरातील योगदानही अविस्मरणीय..

शून्य ते सहा वयोगटातील बालकांसाठी महिला व बाल विकास खाते राबवत असलेल्या योजनांची मदार अंगणवाडी ताईंवर तर आरोग्य विभागाच्या माता बाल संगोपनाची धुरा आशाताईंच्या खांद्यावर सोपवलेली असते. या दोन्ही कर्मचाऱ्यांना आपापल्या विभागाच्या ‘जॉब चार्ट’ प्रमाणे वर्षभर काम असते. असे असताना हे नियमित काम पार पाडत अंगणवाडी व आशाताईंना मागच्या वर्षभरात कोरोना लढ्यात उतरवण्यात आले आहे. आपल्या गावाबद्दल आत्मियतेची असलेल्या या ताई अतिशय गांभीर्याने मोठी जोखीम पत्करत काम पार पाडत आहेत.

Web Title: During the Corona period, Tai An became a front worker in the true sense of the word

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.