यात्रेत आतषबाजी सुरू असताना पडली ठिणगी; २६ यात्रेकरू जखमी, ९ जणांची प्रकृती गंभीर
By बाबुराव चव्हाण | Published: April 11, 2024 07:41 PM2024-04-11T19:41:20+5:302024-04-11T19:41:37+5:30
काहीजण चेंगराचेंगरीमुळे तर काहीजण आगीमुळे जखमी झाले आहेत.
लोहारा (जि. धाराशिव) : लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील ग्रामदैवत श्री नृसिंह यात्रेनिमित्त शोभेच्या दारूची आतषबाजी सुरू असतानाच बाजुलाच असलेल्या शाेभेच्या दारू साठ्यावर ठिणगी पडली अन् माेठा स्फोट झाला. यात जवळपास २६ यात्रेकरू जखमी झाले आहेत. यापैकी नऊ जणांची प्रकृती गंभीर आहेत. यापैकी काहीजण चेंगराचेंगरीमुळे तर काहीजण आगीमुळे जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील ग्रामदैवत श्री नृसिंहची यात्रा गुढी पाडव्याच्या दिवशी असते. यात्रेनिमित्त चार दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी १० एप्रिल रोजी दिवसभराचे कार्यक्रम आटाेपल्यानंतर रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास शोभेच्या दारूची आतषबाजी सुरू झाली. ही आतषबाजी पाहण्यासाठी यात्रेकरूंनी माेठी गर्दी केली हाेती. दरम्यान, आतषबाजी सुय असतानाच अंदाजे रात्री १२ वाजून २० मिनिटाच्या सुमारास शोभेच्या दारू साठ्यावर ठिणगी पडली आणि मोठा स्फोट झाला. यावेळी प्रचंड गाेंधळ उडाला. जाे-ताे पळत सुटल्याने चेंगराचेंगरी झाली. या घटनेत २६ लाेक जखमी झाले. यापैकी नऊ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना लाेहारा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. यात भालचंद्र कांबळे (५०, रा. हिप्परगा रवा), धोंडिबा जाधव (६०, रा. हिप्परगा रवा ), तुकाराम शंकर जाधव (५२, रा. मोघा बु) यांचा समावेश आहे. तर प्रकृती गंभीर असल्याने बालाजी साळुंके (५० ), किशोर जाधव (५०), रमेश जाधव (४९ सर्व रा. धानुरी), श्रवाण प्रताप (३५, रा. हिप्परगा), हर्षद ढेपे (२६), मोतीराम चव्हण यांना धाराशिव, लातूर, उमरगा रूग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आले.
किरकाेळ जखमींना उपचार करून घरी साेडले...
शाेभेच्या दारूच्या स्फाेटात जखमी अथर्व रोकडे (१६, रा. धारूळ), लिंबराज गोरे (४७), दिनकर पाटील (३५) (दोघे रा. बिरवली), लक्ष्मण राठोड (३४, रा.हगलूर), विश्वनाथ जाधव (५५, रा. रामपूर), धम्मा मोरे (४०, रा. देवळाली), वैभव शिवकर (३९, रा. उंडरगाव), सूर्यकांत ढेपे (४४, रा. ताकविकी), नवनाथ कांबळे (४८), यशराज कदम (१८ ), गणपत गुरव (४५ ), दत्तात्रय पवार (५०), गोविंद सूर्यवंशी (२३), तुकाराम जाधव (६५), विठ्ठल मोरे (६०), संजय कांबळे (४०), मधुकर कांबळे (६५ सर्व रा. हिप्परगा रवा ) हे किरकोळ जखमी झाले. उपचार करून यांना लागलीच घरी साेडण्यात आले.