लॉकडाऊन काळात कृषिविषयक ई-मोबाइल पॉकेट बुक ठरतेय प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:23 AM2021-05-31T04:23:58+5:302021-05-31T04:23:58+5:30
उस्मानाबाद : कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची व योजनांची माहिती अवगत व्हावी, या दृष्टीने मोबाइलचा अत्यंत प्रभावी ...
उस्मानाबाद : कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची व योजनांची माहिती अवगत व्हावी, या दृष्टीने मोबाइलचा अत्यंत प्रभावी वापर करता येऊ शकतो याची प्रचिती लॉकडाऊन कालावधीत येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद कार्यालयातील तरुण कृषी अधिकारी सचिन पांचाळ यांनी कृषिविषयक ई-मोबाइल पॉकेट बुक व साहित्याची निर्मिती केली केली आहे. याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे.
तरुण शेतकऱ्यांना कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञान जसे की, माती परीक्षण, जैविक खतांचा वापर, बीजप्रक्रिया, बीबीएफ यंत्राव्दारे पेरणी, खतांचा प्रभावी वापर, निंबोळी अर्काचा उपयोग, कीड-रोग व्यवस्थान, जैविक कीटकनाशक, कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, बीजोत्पादन, गांडुळ खतनिर्मिती अशा हवामान अनुकुल तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेमध्ये पीडीएफ स्वरुपात ई-मोबाइल पॉकेट बुक माध्यमातून मिळत आहे. प्रत्येक विषयाशी संबंधित क्यूआर कोड व वन टच व्हिडिओ प्ले सुविधा दिल्याने यू-ट्यूबवरील माहितीपूर्ण व्हिडिओ सुरू होतो. प्रिंट कॉपीकरिता क्यूआर कोड मोबाइलद्वारे स्कॅन करून व्हिडिओही पाहता येतो. त्यातून तंत्रज्ञान समजण्यास मदतही होत आहे.
पांचाळ यांनी अशा पध्दतीने ३ मोबाइल ई -पॉकेट बुक, ८९ माहिती पत्रिका यांची निर्मिती केली आहे, त्याचबरोबर तंत्रज्ञानाचे ३८ व्हिडिओ तयार केले आहेत. प्रत्येक गावाकरिता व्हाॅट्सॲपचे ग्रुप तयार करून त्यामध्ये प्रसारित करण्यात येत आहे. माहिती अत्यंत आकर्षिक व उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी फायदा होत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील वैयक्तिक लाभाच्या घटकांविषयी डिजिटल ई-साहित्य निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेविषयी साध्या व सोप्या भाषेमध्ये माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोट...
आज प्रत्येक घरामध्ये ॲंड्रॉइड मोबाइल आहे. कोरोनाकाळात कोरोना संसर्गास आळा बसावा, मागील वर्षभरापासून लॉकडाऊन, अनलॉक सुरू आहे. या काळात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी मोबाईल पॉकेट ई-बुक तयार करण्यात आले आहे. याकामी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत आहे.
सचिन पांचाळ,कृषी अधिकारी,पोक्रा,उस्मानाबाद
मी मल्टि नॅशनल कंपनीमध्ये इंजिनिअर आहे. लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉर्म होम करत करत शेती करत आहे. मोबाइलव्दारे मला वेळोवेळी माहितीचे साहित्य प्राप्त होते. माहिती समजायला अत्यंत सोपी असून, क्यूआर कोडला लिंक केल्यानंतर विषयाशी संबंधित व्हिडिओतून परिपूर्ण माहिती मिळते.
उदय कावळे, शेतकरी, बावी
व्हाॅट्सॲप ग्रुपमधून आधुनिक शेतीविषयी माहिती मिळते, व्हिडिओ लिंक ओपन करून माहितीपूर्ण व्हिडिओ बघता येतात. त्याचबरोबर कृषी विभागाद्वारे आयोजित माहितीपूर्ण वेबिनार पाहून शेतीमध्ये मत्स्यपालन, बीज उत्पादन असे नवीन प्रयोग करत आहे.
-बापूराव वट्टे, शेतकरी, बारूळ